घरमुंबईचिमुरडीची मत्यूशी झुंज; रुग्णालयाची मात्र चुप्पीच!

चिमुरडीची मत्यूशी झुंज; रुग्णालयाची मात्र चुप्पीच!

Subscribe

मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका चिमुरडीला तिच्या वडिलांना भेटू दिलं जात नसल्याचा प्रकार वाडिया हॉस्पिटलमधून समोर आलेला असताना रुग्णालय प्रशासन मात्र त्यावर मौन बाळगून आहे.

मुंबईच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये एका दीड महिन्यांच्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरू असल्याचं वृत्त ‘माय महानगर’ने दिल्यानंतर या प्रकरणी मोठी चर्चा सुरू झाली. वाडिया हॉस्पिटलमधल्या संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे ही चिमुरडी शारिरीक व्यंग घेऊन जन्माला आली. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावध भूमिका घेतली असून या वादावर आता काहीही न बोलण्याचा पर्याय रुग्णालयाने स्वीकारला आहे.

नक्की काय झालं या चिमुरडीसोबत?

श्रुतिका आणि अमित पांचाळ हे दाम्पत्य वाडिया हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांकडून प्रेग्नन्सीदरम्यान उपचार घेत होते. वेळोवेळी त्यांचे सल्ले घेत होते. मात्र, बाळामध्ये कोणतं व्यंग आहे की नाही याबाबत माहिती होणारी चौथ्या महिन्यातली सोनोग्राफी करायलाच या डॉक्टरांनी पांचाळ दाम्पत्याला सांगितलं नाही. परिणामी बाळाच्या डोक्यात पाणी झालंय, तिच्या पाठिच्या मणक्याला ३ इंचाची गाठ झालीये आणि त्यामुळे तिचे दोन्ही पाय पॅरालाइज्ड झाले आहेत हे सगळं त्या चिमुरडीच्या जन्मानंतर त्यांना समजलं. तेव्हापासून ही चिमुकली वाडिया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

- Advertisement -

बाळाला भेटायला पित्याला नकार!

दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून न्यायासाठी झगडत असलेले अमित पांचाळ यांना आता त्यांच्या मुलीला भेटायलाही मनाई करण्यात आली आहे. आणि ‘तु्म्ही रुग्णालयात गोंधळ घालता, म्हणून तुम्हाला भेटायला मनाई करण्यात आली’ अशा प्रकारचा खुलासा रुग्णालय प्रशासन नाही तर भोईवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मांढरे यांनी पांचाळ यांना केला. पण ‘आम्ही गोंधळ घातला असेल, तर हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही फूटेज चेक करा. तसं असेल तर आम्ही सगळ्या केसेस मागे घेतो’, असा ठाम दावा पांचाळ कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलचं सोयीस्कर मौन

एकीकडे चिमुकलीच्या पित्याला तिला भेटण्याची परवानगी दिली जात नसताना यावर रुग्णालय प्रशासनाकडून मात्र काहीही सांगण्यात आलेलं नाही. ‘माय महानगर’ने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ‘या प्रकरणी चौकशी होईपर्यंत काहीही बोलता येणार नाही’, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाच्या प्रवक्त्या फोरम स्वार यांनी सांगितलं. शिवाय ‘प्रोटोकॉलनुसार वागले, तर त्यांना नक्कीच मुलीला भेटू दिलं जाईल’, असा दावा देखील केला. मात्र, विझिटिंग अवर्समध्ये गेल्यानंतर देखील त्यांना भेटू दिलं जात नसल्याचा आरोप अमित पांचाळ यांनी केला आहे.

मुलीच्या पित्यावर दबाव?

दरम्यान, पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर राजकीय व्यक्तीने दबाव आणल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. ‘तुम्ही तक्रार मागे घेतली, तर तुम्हाला १० लाख रुपये देतो’, असा फोन आल्याचा दावा मुलीचे वडील अमित पांचाळ यांनी केला आहे. तसेच, ‘पोलिसांनी देखील माध्यमांकडे जाऊन गोंधळ घालू नका, जे काय असेल, ते कायद्यानुसार होऊ द्या, आमच्या तपासात व्यत्यय आणू नका’, असं आपल्याला सांगितल्याचंही अमित पांचाळ यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या चिमुकलीला आणि तिच्या पालकांना कधी न्याय मिळणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -