घरमुंबईउल्हासनगरमधील वालधुनी नदीपात्राला अनधिकृत बांधकामांचा विळखा

उल्हासनगरमधील वालधुनी नदीपात्राला अनधिकृत बांधकामांचा विळखा

Subscribe

वालधुनी नदीपात्रात मागील काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामे होत आहेत. परिणामी यंदाच्या पावसात येथील घरांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.

एकेकाळी विस्तीर्ण पात्र असलेल्या वालधुनी नदी पात्राशेजारीच तर काही ठिकाणी नदी पात्रातच अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे नदीचे मोठ्या नाल्यात रूपांतर झाले आहे. या बांधकामांकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

नदी पात्र अनधिकृत बांधकामांनी मुक्त करावे. अन्यथा या पुरात जीवित अथवा वित्त हानी झाली. तर त्याला मनपा प्रशासन जबाबदार असेल, असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. तर अद्यापही अनधिकृत बांधकामे उभारण्यात येत असल्याने पुराच्या पाण्याचा धोका वाढतो. याबाबत वालधुनी जल बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी पालिकेचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

वालधुनी नदीचा उगम हा श्रीमलंग गडाजवळील तावली डोंगरातून होतो. उगमाच्या प्रवाहाचे पाणी जीआईपीआरच्या डॅममध्ये साठवले जाते. त्यातून सातत्याने पाणी वालधुनी नदीत सोडले जाते. ही नदी अनेक गावखेडे पार करत प्राचीन शिवमंदिरच्या मार्गाने समता नगर, भरतनगर, वडोल गाव, सम्राट अशोक नगर, उल्हास रेल्वे स्थानक, हिराघाट, शांतिनगर मार्गे कल्याणच्या खाडीला मिळते.

नदी पुर्नर्जीवितासाठी शासकीय निधीची प्रतिक्षा

सुमारे ४० वर्षांपूर्वी या नदीचा पाण्याचा प्रवाह अगदी नितळ व स्वच्छ होता. आंघोळ व मासेमारी करण्यासाठी गर्दी होत होती. पात्र कमालीचे रुंद असल्याने अनेक ठिकाणी पिकनिक स्पॉट झाले होते. मात्र कालांतराने नदी पात्राकिनारीच अनधिकृत घरे बांधण्यात आली. त्यात विविध कारखान्यांच्या रसायन मिश्रित पाण्याने एकेकाळी गंगा ठरलेली वालधुनी दूषित झाली. या नदीला पुन्हा पुर्नर्जीवित करण्यासाठी शासनाने कोट्यवधीचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही.

- Advertisement -

नदीचे पात्र रूंद करा

दरम्यान बांधकामांमुळे नदीचे पात्र अनेक ठिकाणी कमी झाले आहे. विशेषतः भरतनगर, सम्राट अशोक नगर, उल्हास स्थानका समोर, हिराघाट ते शांतिनगर या भागातील घरे प्रत्येक पावसाळ्यात पुराच्या पाण्यात जातात. त्यांना पालिकेच्या वतीने पुराचे पाणी ओसरेपर्यंत विविध ठिकाणी आश्रय दिला जातो. ही घरे आता खूप जूनी झाली असून त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी. नदीचे पात्र रुंद करावे, नदीचे रूपडे पालटून टाका, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून पुढे येऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -