घरमुंबईनिवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणार

निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणार

Subscribe

लोकप्रतिनिधींसाठी पाणीसमस्या ठरणार डोकेदुखी

मुंबईत सध्या उन्हाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे सहाजिकच पाण्याचीही मागणी वाढू लागली आहे. आधीच मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केल्याने अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यातच आता वाढत्या मागणीपुढे पुरवठा करण्यात येणारे पाणी कमी पडू लागल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची समस्या अधिकच वाढून नागरिकांसह राजकीय पक्षांचीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये यंदा कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे तलावात अपुरा साठा जमा झाला आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत कमी पाणीसाठा जमा झाल्याने महापालिकेने मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र, पावसाळ्यानंतर लागू केलेल्या या कपातीचा परिणाम हिवाळ्यात जनतेला जाणवत नव्हता, परंतु उन्हाळ्याच्या झळा जाणऊ लागताच पाण्याचीही अधिक मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा आणि वेळेतील कपातीमुळे शीव कोळीवाडा, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम भागांमध्ये पाण्याची तीव्र समस्या भासू लागली आहे. या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करायची वेळ आली आहे.

- Advertisement -

शीव कोळीवाडा परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या जाणवत असून, लोकांना पाणीच मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पाणी मिळत नसल्याने लोक हैराण असून, या भागांमध्ये २० टक्के नव्हे तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीकपात असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे. अंधेरी- जोगेश्वरी पश्चिम भागातील बेहरामबागसह आनंद नगर आदी परिसरांमध्ये सध्या पाण्याची तीव्र समस्या असून, नागरिकांना पाणी मिळत नसल्याने लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी केली आहे. सध्याची कपात ही पाण्यासह वेळेत केलेली आहे. त्यामुळे आधीच अपुरा पाणीपुरवठा होतच आहे. शिवाय आता ही समस्या एवढी वाढली की लोकांची पाणी मिळताना मारामार आहे,अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सर्व तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या ७ लाख ३७ हजार ९३४ दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा आहे. जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी लोकांच्या वाढत्या मागणीपुढे कपातीमुळे केलेला पाण्याचा पुरवठा पुरेसा नाही. परिणामी अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झालेली आहेच, पण भविष्यात ही समस्या अधिकच वाढली जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -