घरमुंबईपाणीकपातीच्या संकटासोबत ठाणेकरांवर दरवाढीची कुर्‍हाड

पाणीकपातीच्या संकटासोबत ठाणेकरांवर दरवाढीची कुर्‍हाड

Subscribe

वरूणराजाने पाठ फिरवल्याने मुंबईसह अनेक मोठ्या शहरातून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच महापालिका क्षेत्रातून पाणी कपात करण्यास सुरुवात झाली आहे. ठाणेकरांवरही पाणी दरवाढीचे संकट आले आहे. पाणी पुरवठा, शुद्धीकरण खर्च भागविण्याकरिता तसेच जकात कर रद्द झाल्याने व जीएसटी कर पद्धती लागू झाल्याने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मुंबई बाहेरील धरण परिसरातील ठाणे,शहापूर, भिवंडी पालिकांवर 50 टक्के दरवाढीचा अतिरिक्त बोझा मुंबई महापालिकेने टाकला आहे. ज्यामुळे आता ठाणेकरांना पाणीकपातीसोबत दरवाढीलाही सामोरे जावे लागणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तब्बल 15 वर्षांनंतर मुंबई महापालिकेने ही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे वर्षागणिक 14.58 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मुंबई पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. मात्र सुमारे 5 कोटी अकरा लाखाचा भुर्दंड ठाणेकरांच्या माथी पडणार आहे. सध्यस्थितीत मुंबईसाठी दररोज 3,800 दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील 150 दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते. पालिका हद्दीत लागू असलेले दर, नगरबाह्य विभागास लागू असलेले दर आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण विभागाद्वारे महापालिकेला लागू असलेल्या दरांनुसार ही दरवाढीची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानुसार, पाणी पुरवठ्याच्या दरात 50 टक्के दरवाढ सुचवण्यात आली आहे.

- Advertisement -

या दरवाढीमुळे मुंबई महापालिकेला वाढीव उत्पन्न मिळणार असले तरी ठाणे महापालिकेला मात्र हा वाढीव भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यासाठी आधी पालिकेने गळकी पाईपलाईन दुरुस्त करावी. यामुळे कित्येक लीटर पाणी वाया जात आहे. संपूर्ण ठाणे शहरात होत असलेल्या पाणीचोरी वर कारवाई करावी केली जाते. पाणी चोरीवर कोणतेही निर्बंध नाहीत. तक्रार करायची तर कुणाकडे. या सर्व प्रकाराला पालिका जबाबदार आहे. तेव्हा पालिकेने सर्व प्रथम ठाण्यातील पाणी गळती आणि चोरी थांबवावी ज्यामुळे पाण्याची प्रचंड बचत होईल असे मतही ठाणेकरांनी व्यक्त केले.

मुंबई महापालिकेने जरी ही दरवाढ सुचविली असली तरी त्यासंदर्भातील पत्र अद्यापही ठाणे महापालिकेला प्राप्त झालेले नाही. मुंबई महापालिकेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करुनच पुढील निर्णय घेतला जाईल. शक्यतो या दरवाढीचा भूर्दंड सामान्य ठाणेकरांवर पडू देणार नाही.
– रविंद्र खडताळे, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग ठामपा

- Advertisement -

ठाणे शहरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. केवळ 199 कोटी रुपये शासनाला देऊन शाई धरण विकत घेता येणार आहे. मात्र, पालिका ते काम करण्याऐवजी ठाण्याचा नवीन प्रस्ताव आणत आहे. आज ठाण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात केली जाणार आहे. आज घोडबंदरला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वागळे इस्टेटमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याला जबाबदार ठाण्याचे सत्ताधारीच आहेत.
– डॉ.जितेंद्र आव्हाड, आमदार

2018च्या सप्टेंबर महिन्याच्या महासभेत खाडीचे खारे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला. 58 विरुद्ध 38 अशा बहुमताने हा प्रकल्प सत्ताधार्‍यांनी नेहमीप्रमाणे गदारोळात मंजूर करून घेतला. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आणि आखाती देशांच्या धर्तीवर ठाण्याच्या खाडीच्या क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्याची ती योजना होती. त्या योजनेचे काय झाले ?
– मिलिंद कोवळेकर, ठाणेकर नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -