घरमुंबईहर्षवर्धन पाटील यांनाही भाजपचे वेध

हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपचे वेध

Subscribe

 विजयसिंह मोहिते पाटील यांची घेतली भेट

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता बळ मिळाले आहे. इंदापूर तालुक्यात बुधवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी टीका केली. तत्पूर्वी अकलूज येथे जाऊन त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच आपला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.

इंदारपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील म्हणाले की, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना भरभरून मते दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार, असे आश्वासन मिळाल्यामुळेच आपण सुळे यांना इंदापूरमधून ७१ हजारांचे मताधिक्क्य मिळवून दिले होते. मात्र तरीही राष्ट्रवादीने इंदापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रा आणून इंदापूरची जागा राष्ट्रवादीच घेणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता कुणालाही न घाबरता आपल्याला आक्रमक व्हावे लागेल, अशी भावना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

लोकसभेलाच येणे अपेक्षित होते
हर्षवर्धन पाटील १९९५ पासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर या मतदारसंघाचे २०१४ पर्यंत प्रतिनिधित्व करत होते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी तोडली आणि सर्व जागा स्वबळावर लढविल्या. यामध्ये इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांचा विजय झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांची मदत घेतली तरीही इंदापूरबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यावर हर्षवर्धन पाटील यांनी आज नाराजी व्यक्त केली. याच कारणास्तव बुधवारी हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. उशीरा का होईना पण आलात, लोकसभेलाच आला असतात, तर जास्त आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी या मेळाव्यात सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -