घरमुंबईपाणथळ जागेवरील अतिक्रमण हटणार

पाणथळ जागेवरील अतिक्रमण हटणार

Subscribe

जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे

भुईंगाव येथील पाणथळ जमिनीवर अतिक्रमण करून तिवरांची झाडे तोडून त्याठिकाणी उभारण्यात आलेला बेकायदा कोळंबी प्रकल्प, अनधिकृत बांधकामांवर येत्या 10 डिसेंबरला कारवाई करण्यात येणार असून संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर वसई विरार महापालिकेने हा निर्णय घेतल्यानंतर सोमवारपासून सुरु असलेले आमरण उपोषण बुधवारी रात्री मागे घेण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाने वनशक्ती या संस्थेच्या जनहित याचिकेवर निर्णय देताना भुईगाव येथील सरकारी व पाणथळ जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत कारभार करणार्‍या भूमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कारवाई होत पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक, सदस्य मेकॅन्झी डाबरे व मॅक्सवेल रोझ यांनी 2 डिसेंबरपासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

- Advertisement -

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी स्वतः वसई तहसील कार्यालयात येऊन वसईचे प्रांत, तहसीलदार, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांची बैठक बोलावून उपोषणकर्त्यांशी आणि जनतेशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्वतः उपोषणस्थळी जाऊन महानगरपालिकतर्फे 10 डिसेंबर रोजी सर्व अतिक्रमण हटवण्यात येऊन सर्व भूमाफियांवर गुन्हेही दाखल करण्यात येतील, हे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी कारवाईचे लेखी पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन आंदोलन समाप्त केले.

लेखी आश्वासनानुसार येत्या 10 डिसेंबरला कारवाई झाली नाही तर स्थगित उपोषण पुन्हा सुरु केले जाईल, असा इशारा समीर वर्तक यांनी दिला आहे. पर्यावरण संवर्धन समितीचे मार्गदर्शक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक व हरित वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उपोषणाला हजेरी लावून पाठिंबा दिला होता. कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी समीर वर्तक यांना संपर्क साधून माहिती घेऊन मदत केली. खासदार राजेंद्र गावित आणि माजी आमदार विवेक पंडित यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सातत्याने संपर्क साधून त्वरित कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या. वनशक्तीचे संचालक दयानंद स्टॅलिन, धीरज परब, शिवसेनेचे पालघर लोकसभेचे संघटक केदार काळे यांनी उपोषणास उपस्थित राहून मदत केली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -