घरमुंबईमंत्रालयासमोर विष प्राशन करणार्‍या दुसर्‍या महिलेचाही मृत्यू

मंत्रालयासमोर विष प्राशन करणार्‍या दुसर्‍या महिलेचाही मृत्यू

Subscribe

मुंबईतील मंत्रालय परिसरात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी ३ जणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या २ महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर दुसर्‍या महिलेचा मंगळवारी पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. संगीता डवरे असे या महिलेचे नाव आहे.

पुण्यातील मावळचे रमेश मोहिते, धुळ्यातील शीतल गादेकर आणि नवी मुंबईच्या संगीता डवरे यांनी २७ मार्चला मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संगीता डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पतीच्या आजारपणात रुग्णालयाचा जो खर्च झाला होता, त्यामध्ये मोठी तफावत असून फसवणूक झाल्याचा आरोप डवरे यांनी केला होता. पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संगीता डवरे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातच त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

- Advertisement -

रमेश मोहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जनता जनार्दन प्रवेशद्वारावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. अपंगांना मिळणार्‍या दीड हजार रुपयांच्या पेन्शमध्ये वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती, तर शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर पी-१६ आहे. २०१० मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकार्‍यांनी संगनमत करून शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे असलेला हा प्लॉट नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस नोटरी बनवून नावावर करून घेण्यात आला.

२०२० पासून शीतल गादेकर यांनी या जागेसंदर्भात सतत पाठपुरावा सुरू केला होता. न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु या घटनेत त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान गेल्या आठवड्यात त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -