घरठाणेमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राडा

Subscribe

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्‍याला शिंदे गटाकडून मारहाण,कारवाई करण्यावरून उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा हंगाम सुरू असून परीक्षा संपल्यानंतर सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच महागाईपासून बेरोजगारीपर्यंत सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवण्यातच मश्गुल असल्याचे दिसत आहे. राज्याच्या राजकारणाचे शक्तीकेंद्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सोमवारी रात्री ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाकडून मारहाण झाली.

या घटनेनंतर ठाण्यात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा ‘फडतूस गृहमंत्री’ असा उल्लेख करीत गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या, अशी मागणी केली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख गुंडांचे मंत्री असा केला. त्यावर अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. या वाक्युद्धामुळे राज्यातील वातावरण कमालीचे तापले होते.

- Advertisement -

ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ठाण्याची ओळख शिवसेनेचे ठाणे, जीवाला जीव देणारे, महिलांचे रक्षण करणारे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे आणि सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणे अशी आहे. तीच ओळख पुसून गुंडांचे ठाणे असे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ठाण्यात महिलांची गँग बनायला लागली आहे. महिला गुंडगिरी करायला लागल्या आहेत. मुख्यमंत्री हे गुंडांचे मंत्री झाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसैनिक शांत राहिले याचा अर्थ तुमच्यासारखे जे सर्वोच्च न्यायालय म्हणते त्याप्रमाणे शिवसैनिक नपुंसक नाहीत. मनात आणले तर तुम्हाला ठाण्यातून मुळासकट उपटून टाकण्याची हिंमत, जिद्द दाखवणारे शिवसैनिक आजदेखील ठाण्यात आहेत, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे यांनी त्यांना राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय, असा उल्लेख केला. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री राज्याला मिळाला. नुसती फडणविशी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतात की, त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला.

- Advertisement -

तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलावून मारहाण करण्यात आली. असे सांगताना मला वाटते फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर टीका केली. दरम्यान, फडणवीसांच्या घरावर काही आले तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटक केली जाते. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणविसी दाखवण्याची त्यांची हिंमत नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना ज्यांच्या नावाने यात्रा काढतात, त्यांचे विचार जर रक्तात नसतील तर फुकाच्या यात्रा काढू नका. आमचे सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जेलयात्रा करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमके काय झाले?
सोमवारी रात्री घोडबंदर रोड येथे टिटवाळा येथे राहणार्‍या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना चरई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे या महिलेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेदेखील होते. यानंतर ते तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे गेले असता पोलीस आयुक्तच कार्यालयात उपस्थित नव्हते. याचदरम्यान त्यांनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांवर निशाणा साधला.

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री मिळाला. नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्रीपदी मिरवत आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्यावर मिंधे गटाने हल्ला केला तरी त्यावर कारवाई करायला हलायला तयार नाही. अशा फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झाले की एसआयटी नेमायची. सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक सरकार असे भाष्य केले. ठाण्याची ओळख पुसून गुंडांचे ठाणे अशी झाली आहे.
– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझा प्रश्न असा आहे की, दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यावर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवत नाहीत, त्या मंत्र्यांभोवती लाळ घोटत असतात, अशा मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात, त्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे? अडीच वर्षे घरी बसून काम करणार्‍या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही. आमचे तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -