घरमुंबईBMC Covid Scam Case : कंत्राटदार फर्निचरवालाचा वरळीतील फ्लॅट सील, बुधवारच्या धाडीतील...

BMC Covid Scam Case : कंत्राटदार फर्निचरवालाचा वरळीतील फ्लॅट सील, बुधवारच्या धाडीतील डायरीत अनेकांचा कच्चा-चिठ्ठा

Subscribe

मुंबई महापालिका कोविड घोटाळ्यात यासीर फर्निचरवालाचा वरळी येथील फ्लॅट सील करण्यात आला आहे. ईडीने ही कारवाई केली आहे. फर्निचरवाला सध्या भारताबाहेर आहे. ईडीने त्यांचे घर सील केले असून ते मुंबईत परतल्यानंतर कुलूप उघडले जाणार आहे.

मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई पालिका कोविड घोटाळा प्रकरणी सुरु केलेली कारावईत ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून त्यामध्ये पालिकेतील अधिकारी, राजकारणी, कंत्राटदार आणि काही कर्मचारी हे ईडीच्या रडारवर आहेत. वरळी येथील एका उद्योजकाचा फ्लॅट ईडीने सील केला आहे. उद्योजक यासिर फर्निचरवाला यांच्या एजन्सीला कोविड फिल्ड हॉस्पिटलचे काम मिळाले होते. पालिकेचे अधिकारी आणि पुरवठादार यांच्यात संपर्क असल्याचा संशय ईडीला आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात यासिर फर्निचरवाला यांचा वरळी येथील फ्लॅट सील करण्यात आला आहे. फर्निचरवाला हे मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. तसेच फर्निचरवाला हे मुंबई महापालिकेत कित्येक वर्षे लायज्निंग (एजंट) आतापर्यंत ईडीने केलेल्या कारवाईमध्ये ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात ईडीला एक डायरी देखील सापडली आहे. काही एजंट्स आणि कंत्राटदार यांची ही साखळी असल्याचे तपासात उघड झाले आहे. कंत्राट देण्यापूर्वी हे एजंट्स सक्रिय झाले, कंत्राटदारांना कोणत्या आधारावर परवानग्या देण्यात आल्या याचा ईडी शोध घेत असताना ही डायरी बुधवारी टाकलेल्या धाडीत सापडली आहे. त्यामध्ये मोठ्या देवाण-घेवाणीचाही उल्लेख असल्याची माहिती आहे. कोणाला किती पैसे दिले गेले याच्या नोंदी डायरीत असल्याची माहिती आहे. यात काही मुबंई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. ईडी या सर्व तपशीलांची चौकशी करत आहे. त्यासोबतच यात आढळेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

फर्निचरवाला परदेशात, घर सील

ईडी अधिकाऱ्यांनी बुधवारी फर्निचरवाला यांच्या निवासस्थानी छापा टाकला, तेव्हा ते परदेशात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ईडीने त्यांच्या दारावर असलेले कुलूप सील केले आहे. फर्निचरवाला परदेशातून परतल्यानंतर पंचासमक्ष हे कुलूप उघडले जाईल आणि त्यांच्या घराची झडती घेतली जाणार आहे. त्यासोबतच त्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे.

हेही वाचा : इकबाल चहल, पी. वेलरासू ईडीच्या रडारवर; कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संशयाची सुई

- Advertisement -

कोरोना काळात मुंबई पालिकेंतर्गत येणाऱ्या भागात कोविड संदर्भातील कामे करण्यासाठी 4000 कोटींहून अधिक रकमेची कामे कंत्राटदारांना देण्यात आली होती. यातील बहुतेक कंत्राट आणि करार हे पाच एजंटांना देण्यात आले होते. यात काही खासगी व्यक्तींची महत्त्वाची भूमिका होती. याची चौकशी ईडी करत आहे. ईडी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच कंत्राटदारांच्या सूरज चव्हाण संपर्कात होते. सूरज चव्हाण हे शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई महापालिकेत कोणतंही राजकीय पद नसताना चव्हाण यांचा कंत्राट वाटप प्रक्रियेत सक्रिय सहभाग असल्याची ईडीची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते आधी एक कंत्राटदाराची निवड करत होते आणि नंतर मुंबई पालिका अधिकाऱ्यांना त्यालाच कंत्राट मिळेल यासाठी अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकत होते. त्यासाठी त्यांच्या निकषानुसार निविदा आणि संबंधीत कागदपत्रांचीही पूर्तता करत होते.

ईडीच्या तपासात असेही समोर आले आहे, की पालिकेचे अधिकार आणि कंत्राटदार यांच्यातील संवाद सेतूचे काम हे एजंट करत होते. यांच्यातील बेकायदेशीर देवाण घेवाणीचेही पुरावे सापडले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अडचणीत वाढ

या प्रकरणी ईडीने सोमवारी आयएएस अधिकारी तथा तत्कालिन मुंबई पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि शिवसेना (ठाकरे गट) सचिव सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी हजर राहाण्याचे समन्स बजावले आहे.

हेही वाचा : संजीव जयस्वालांना टार्गेट केले जातेय! मुख्य सचिवांच्या दरबारी अधिकार्‍यांची नाराजी

माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर

मुंबई पालिका कोविड घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोविड काळात पेडणेकर महापौर होत्या. त्यांच्याच अधिकारात अनेक निर्णय आणि काही शिफारसीनंतर कंत्राटे देण्यात आली. त्यामुळे घोटाळ्यांच्या फाईल पुन्हा एकदा उघडल्या जात असताना पेडणेकर यांचे नाव चर्चेत आले आहे.
याआधी शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिव सूरज चव्हाण यांच्या घरावर छापा पडला आहे, त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आता ठाकरे गटाचे इतर नेते आणि पालिकेतील लोकप्रतिनिधींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या घोटाळ्यासंबंधी सर्वप्रथम आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदिप देशपांडे यांनीही किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतलेले आहे. पेडणेकर यांच्या नातेवाईकांना कोरोना काळात कंत्राट मिळाल्याचा आरोप सोमय्यांनी केलेला आहे.
कोविडचा तो काळ असल्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पेंडॅमिक अॅक्टनुसार कोणतीही निविदा न काढता खरेदी करण्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार होता. त्यानुसारच मुंबई पालिकेत लोकांचे जीव वाचवण्याला प्रथम प्राधान्य देत सर्व निर्णय घेतल्याचे किशोरी पेडणेकरांनी शनिवारी पक्षाच्या कार्यक्रमात म्हटले आहे. कितीही दबाव आला तरी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला सोडणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : ED : जयंत पाटील पुन्हा टार्गेट; सांगलीतील राजारामबापू सहकारी बॅंकेवर ईडीचा छापा

यासिर फर्निचरवाला यांच्या घरी धाड पडल्याने पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. फर्निचरवाला हे मागील दोन दशकं मुंबई महापालिकेत लायज्निंगचे काम करीत असल्याने सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, पालिका उपायुक्त, सह आयुक्त अतिरिक्त आयुक्तांपर्यंत त्यांचे सौहार्दपूर्ण आणि अर्थपूर्ण संबंध असल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे. त्यामुळे यासिर मलिक यांच्या चौकशीनंतर अनेक बडे मासे गळाला लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -