घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशेतात सुरू होते टोमॅटो काढणीचे काम; तेवढ्यात आला बिबट्या आणि...

शेतात सुरू होते टोमॅटो काढणीचे काम; तेवढ्यात आला बिबट्या आणि…

Subscribe

नाशिक : शहरालगत असलेल्या एका शेतात टोमॅटो काढत असलेल्या शेतमजुरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, शेताला आजूबाजूने कंपाऊंड असल्याने हा बिबट्या शेतातच असून त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.

कळवण शहरात असलेल्या हरी ओम लॉन्सपासून हाकेच्या अंतरावर संदीप पगार यांच्या शेतात शुक्रवारी (दि. २३) सुमारे ४० हून अधिक मजूर टोमॅटो काढणीचे काम करत असताना दुपारी एकच्या सुमारास शेतात लपून बसलेल्या बिबट्याने भिवसन रामदास पवार (शेरी, ता. देवळा) या मजुरावर हल्ला करत चावा घेतला. इतर मजुरांनी आरडाओरड करत धाव घेतल्याने बिबट्या पळाला. जखमी झालेल्या भिवसन पवार यास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता छातीच्या उजव्या बाजूला बिबट्याने चावा घेतल्याने रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले तर पाठीवरही जखमा झाल्याने प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, मजुरांनी शेताचे गेट लावून घेतल्याने हा बिबट्या शेतातच असल्याचे वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्या शेतात बसलेला आढळून आला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शेतात पिंजरा लावण्यात आला असून या घटनेने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये मात्र घबराट पसरली आहे.

बिबट्याचा वावर नित्याचाच

कळवण शहरातील अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जुना ओतूररोड आणि हरी ओम लॉन्सच्या रस्त्याने जातात. शुक्रवारी पहाटे जुन्या ओतूररोडने मॉर्निंग वॉकला जाणार्‍या काही नागरिकांना बिबट्या दिसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे तो हाच बिबट्या असावा असा कयास बांधला जात असून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -