घरपालघरतनिष्काप्रकरणी सोळा दिवसांनी गुन्हा दाखल

तनिष्काप्रकरणी सोळा दिवसांनी गुन्हा दाखल

Subscribe

महावितरण व वसई विरार महापालिका अधिकार्‍यांच्या निष्काळजी व हलगर्जीमुळेच तनिष्काचा मृत्यू झाल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केला होता. त्यामुळे या घटनेतील दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

वसई : शॉक लागल्याने १६ ऑगस्टला मृत्यूमुखी पडलेल्या तनिष्का कांबळेप्रकरणी तब्बल सोळा दिवसांनी अर्नाळा पोलिसांनी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वसई- विरार महापालिका आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचार्‍यासह ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हयात कुठल्याही अधिकारी, कर्मचार्‍याचे थेट नाव नसल्याने पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.विरार पश्चिम-बोळींज येथील ब्रॉल सोसायटीत राहणार्‍या तनिष्का कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने झाला होता. महावितरण व वसई विरार महापालिका अधिकार्‍यांच्या निष्काळजी व हलगर्जीमुळेच तनिष्काचा मृत्यू झाल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केला होता. त्यामुळे या घटनेतील दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

रहिवाशांच्या रोषानंतर बुधवार, 17 ऑगस्ट रोजी विद्युत निरीक्षक पालघर यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. दोन दिवसांत त्यांचा अहवाल येणे अपेक्षित होते. या अहवालानंतरच अर्नाळा पोलीस दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याने सर्वांच्याच नजरा या अहवालाकडे लागलेल्या आहेत. तनिष्का कांबळे हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर व महावितरण आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांची जबानी घेतल्यानंतरच या प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती विद्युत निरीक्षक प्रशांत माने यांनी दिली होती. पण, विद्युत निरीक्षकांचा तब्बल दोन आठवडे उलटूनही या प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल आला नाही. परिणामी तनिष्काच्या मृत्यूस कारणीभूत दोषींवर गुन्हे दाखल होण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर रोष व्यक्त केलेला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा तनिष्काचे वडिल लक्ष्मण कांबळे यांच्या तक्रारीवरून अर्नाळा पोलीस ठाण्यात महावितरण आणि वसई- विरार महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तनिष्काचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे म्हटले असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. महावितरणकडूनही चौकशी अहवाल देण्यास उशिर लावला जात आहे. आता गुन्हा दाखल केला असला तरी थेट कुठल्याही अधिकारी, कर्मचार्‍यावर ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीनंतरच खरा गुन्हा कुणावर दाखल होईल, हे उजेडात येईल. पण, आतापर्यंतचा पोलिसांचा तपास पाहता खरा गुन्हेगार हाती लागेल का हीच शंका आहे. म्हणूनच तनिष्काला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -