घरपालघरभारतीय इंग्रजी सर्वात समृद्ध

भारतीय इंग्रजी सर्वात समृद्ध

Subscribe

पुढे सर विल्यम जोन्स यांच्या भाषाकुल सिद्धान्ताच्या संदर्भात भारतीय भाषा आणि युरोपियन भाषा यांचा सहसंबंध त्यांनी सांगितला.

वसईः भारतीय इंग्रजीच्या जडणघडणीत इतर भारतीय भाषांमधून आलेल्या शब्द संपदेचा मोलाचा वाटा असून या शब्दसंग्रहाच्या समावेशामुळे ती अधिक समृद्ध होत गेली, असे गौरवोद्गार प्रा. डॉ. क्लॉडिया लांगं यांनी वसईत बोलताना काढले. वसईतील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने ‘भारतीय इंग्रजी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. जर्मनीतील ड्रेस्डन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठातील ‘इंग्रजी भाषा शास्त्र अध्यासना’ च्या प्रमुख प्रा. डॉ. क्लॉडीया लांगं या प्रमुख पाहुण्या आणि साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. भारतातील ब्रिटिशांच्या आगमनानंतर इंग्रजी भाषेचा प्रचार-प्रसार भारतात कसा होत गेला याचा ऐतिहासिक आढावा प्रा. डॉ. क्लॉडीया यांनी यावेळी बोलताना घेताना तात्त्विक तसेच संरचनात्मक मांडणी यांचा समतोल असणारे अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. भारतीय इंग्रजी संदर्भात केलेल्या मांडणीमध्ये त्यांनी अठराव्या शतकापासून वासाहतिक काळातील भारतातील भाषिक परिस्थितीचा इंग्रजी भाषेसंदर्भात आढावा घेतला. सुरुवातीच्या टप्प्यावर तंजावरचे मराठा संस्थानिक सरफोजीराजे दुसरे, जर्मन मिशनरी क्रिस्टियन फ्रेडरिख श्वार्त्झ यांच्या योगदानाचा परामर्श घेतला. पुढे सर विल्यम जोन्स यांच्या भाषाकुल सिद्धान्ताच्या संदर्भात भारतीय भाषा आणि युरोपियन भाषा यांचा सहसंबंध त्यांनी सांगितला.

१९ व्या शतकात भाषेचे सांकेतिकीकरण कसे झाले हे सांगून रेन आणि मार्टिन यांच्या व्याकरणाच्या भारतीय इंग्रजी संदर्भातील योगदानाचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. आदेशात्मक आणि वर्णनात्मक व्याकरणाचा संदर्भ देत त्यांनी पारंपरिक व्याकरणाबरोबर भाषेच्या बदलत्या स्वरुपाचा विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. ’भारतीय इंग्रजी’ या भाषाविशेषाचा ऐतिहासिक आढावा घेत असतानाच त्यांनी भाषेची संरचना आणि तिची जगभरातील रूपे याबाबतही मार्मिक विवेचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी, “कोणत्याही भाषेचा अभ्यास माणसाला अधिक शहाणे बनवतो आणि म्हणून भाषाशिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ” असे प्रतिपादन केले. मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. सचिन लबडे यांनी भारतीय भाषांवर इंग्रजीच्या पडणार्‍या प्रभावाकडे (पर्यायाने भारतीय इंग्रजीकडे) तरुण पिढीने सकारात्मक पद्धतीने पाहावे असे सांगितले. जिवंत भाषाच परस्परांना प्रभावित करत असतात. भाषांमध्ये शब्द येतात जातात. परंतु त्या माध्यमातून घडणारा परस्परसंवाद महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचा औपचारिक संदर्भात वापर करताना होणार्‍या गफलतींकडे लक्ष देण्याचीही गरज असल्याचे लबडे यांनी सांगितले.

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ. दीपा मुर्डेश्वर-कत्रे आणि प्रा. डॉ. विजयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या भारतीय इंग्रजीमध्ये लेखन करणार्‍या साहित्यिकांच्या साहित्याचे दर्शन घडवणार्‍या भित्तीपत्रकाचे अनावरणही या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात प्रा. क्लॉडीया यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. भारतीय संदर्भात इंग्रजी भाषा ही मुक्त करणारी भाषा असून आजच्या जागतिकीकरणाच्या काळात भारतीय इंग्रजीला चांगले भवितव्य असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपा मुर्डेश्वर-कत्रे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. श्रीराम डोंगरे यांनी सूत्रसंचलन केले आणि प्रा. माधव पवार यांनी आभारप्रदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -