Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरवारीस पठाणांपाठोपाठ या मोठ्या नेत्याला भाईंदरमध्ये नो एन्ट्री

वारीस पठाणांपाठोपाठ या मोठ्या नेत्याला भाईंदरमध्ये नो एन्ट्री

Subscribe

दोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते वारीस पठाण यांनी मीरा- भाईंदर शहरात येण्याचा प्रयत्न केला.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहरात 21 जानेवारी रोजी राम मंदीर लोकार्पणाच्या आदल्या दिवशी मिरवणूक काढताना धार्मिक तेढ निर्माण झाली होती.त्यावेळी हिंसेच्या काही घटना देखील घडल्या होत्या.या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. मीरा रोड येथे २५ फेब्रुवारी रोजी ठाकूर राजा सिंह (टी राजा ) यांची मिरवणूक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेला टी राजा सिंग यांनी प्रक्षोभक भाषण किंवा वादग्रस्त विधान केल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मीरा-भाईंदर पोलिसांनी टी राजा यांच्या मिरवणूक व जाहीर सभेला परवानगी नाकारली आहे. मीरा -भाईंदर शहरात २१ जानेवारी रोजी दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगल परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मोठा अनुचित प्रकार होण्यापासून पोलिसांनी रोखले होते. आता पुन्हा शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरा बाहेरील कोणत्याही नेत्याला शहरात प्रवेश नाकारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते वारीस पठाण यांनी मीरा- भाईंदर शहरात येण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पोलिसांनी पठाण यांना दहिसर टोलनाका येथे अडवून मीरा -भाईंदर शहरात येण्यास मज्जाव केला होता. त्यांना पुन्हा परत जाण्यास भाग पाडले. त्यानंतर आता पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी तेलंगाना येथील आमदार टी राजा हे मीरा- भाईंदरमध्ये येणार असल्याचे व त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले होते. काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते एस के स्टोन मीरा रोडपर्यंत मिरवणूक व त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून तेलंगणा राज्याचे आमदार ठाकूर राजा सिंह ( टी राजा) हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते. टी राजा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यांमध्ये ५१ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अनेक गुन्हे टी राजा यांनी इतर समाजाबद्दल धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य केल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. शहरात शांतता असताना पुन्हा टी राजा हे शहरात येऊन वादग्रस्त विधान केल्यास त्याच्या प्रतिक्रिया उलटून मीरा -भाईंदर शहरात पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बारावी, दहावीच्या व इतर शालेय महाविद्यालयीन परीक्षा कालावधी आहे. मिरवणूक व सभेमुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते तसेच मीरा -भाईंदर शहरात १३ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जमाबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांनी अशी कारणे सांगत टी राजा यांची मिरवणूक व सभा घेण्यास परवानगी नाकारली असल्याचे पत्र आयोजकांना दिले आहे. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना टी राजा यांनी मीरा- भाईंदर शहरात येण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -