घरसंपादकीयओपेडआपत्कालात आठवते आपली मातृृभाषा, आपला देश!

आपत्कालात आठवते आपली मातृृभाषा, आपला देश!

Subscribe

मराठी भाषेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो. शासकीय पातळीवर मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पण एका बाजूला मराठी माणसांना आपल्या भाषेबद्दल आपलेपणा वाटतो, पण त्याच वेळी आपल्या मुलांनी जागतिक स्पर्धा करावी असे पालकांना वाटत आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना मराठी माध्यमांकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालतात. इंग्रजी भाषा शिकण्याच्या नादात सगळ्या मराठी भाषेवर वरवंटा फिरवला जात आहे. कारण इंग्रजी माध्यमात मुलांना थेट इंग्रजीत शिकवले जाते, त्यांना मराठीतून इंग्रजी असे शिकवले जात नाही. त्यामुळे आपल्या मातृभाषेत त्या वस्तूला काय म्हणतात ते त्यांना कळत नाही. घरात आंबा या फळाला आंबा म्हणत असतील, पण त्याच फळाला इंग्रजी शाळेत थेट मँगो असे म्हटले जाते. त्यामुळे बरेचदा मुलांचा गोंधळ उडतो. विविध भाषा अवगत असायला हरकत नाही, पण आपल्या मातृभाषेच्या संदर्भातच या सगळ्या भाषांचा माणूस विचार करत असतो. त्यामुळे त्याच्या मातृभाषेला विशेष महत्व असते. जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते, तेव्हा माणसाला आपली मातृभाषा, आपली माणसे, आपला गाव, आपला देश आठवतो. याचा अनुभव अनेकांनी कोरोना काळात घेतला आहे.

जागतिक मातृभाषा दिन बुधवारी साजरा करण्यात आला. जगभरात विविध भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांचे ते वैविध्य टिकून राहावे म्हणून १९९९ साली युनोस्काने हा दिवस आंतरराष्ट्रीय भाषा दिवस म्हणून जाहीर केला. येत्या २७ फेब्रुवारीला ज्ञानपीठ पुरस्कारने सन्मानीत झालेले साहित्यिक वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येईल. मराठी ही मराठीजनांची भाषा आहे, पण जसा काळ बदलतो आहे, तशी ती मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचे प्रयत्नपूर्वक संवर्धन व्हावे, म्हणून शासकीय पातळीवर तसेच लोकांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर त्याचे मुलांना चांगल्या प्रकारे आकलन होते. विषय चांगल्या प्रकारे समजतो. जसे एखादे चित्र लांबून बघणे आणि जवळून बघणे यात फरक असतो, लांबून बघितल्यावर ते आपल्याला दिसते, पण जवळून बघितल्यावर त्यातील बारकावे आपल्याला अधिक कळतात.

मातृभाषेच्या बाबतीत तसेच आहे, एखादा विषय आपण मातृभाषेतून शिकत असू तर त्याच्यातील बारकावे आपल्याला अधिक कळतात. कुठल्याही गोष्टीतील बारकावे कळले तरच व्यक्तीमधील विचार करण्याची शक्ती जागी होते. त्याच्यातील संशोधकवृत्ती जागी होते. अगदी भारताचा जरी विचार केला तरी प्रत्येक राज्याची आपली एक वेगळी भाषा आहे, त्यात पुन्हा काही पोट भाषा आहेत. त्यापुढेही जाऊन विविध बोली आहेत. ज्यामध्ये विशेषत: ग्रामीण भागात लोक एकमेकांशी संवाद साधतात. या बोलींमध्ये फारसे लिहिले जात नसले तरी एकमेकांशी सहज संवादासाठी त्यांचा उपयोग होतो. अशा बोलींमधून संवाद साधण्यामध्ये एक अनौपचारिकता असते. त्यामुळे सहज संवाद साधला जातो. त्या सहजतेतून एक गोडवा आणि एकामेकांविषयी आपलेपणा निर्माण होत असतो.

- Advertisement -

कुठलेही मूल त्याला लहानपणी जेव्हा भाषेचे आकलन होऊ लागते, तेव्हा जी भाषा त्याच्या कानावर पडते ती त्याची मातृभाषा असते. आई आपल्या अपत्याला तिला अवगत असलेल्या भाषेतून जगाची ओळख करून देत असते. ती ज्या भाषेत त्याला आजूबाजूच्या माणसांची आणि वस्तूंची ओळख करून देतेे, त्याच भाषेतून ते मूल त्यांना ओळखू लागते. घरातल्या मांजराला मुलाच्या आईने मांजर म्हणून ओळख करून दिली तर पुढे त्याला तसे ओळखू लागते. इतकेच काय पण आई असा शब्दसुद्धा त्याची आई त्या लहान मुलाला शिकवते. ते मूल जेव्हा आई म्हणू लागते तेव्हा ती त्याला ओ म्हणून होकार देते तेव्हा त्याला कळते की, या व्यक्तीला आई म्हणतात आणि ही आपली आई आहे. इतकेच काय त्या मुलाची आई त्याला विशिष्ट नावाने हाक मारते, त्याला तेे मूल प्रतिसाद देते, पुढे त्याची आई त्याला त्याच नावाने हाक मारते, ते मूल प्रतिसाद देत राहते, त्यातून आपले नाव हे ते विशिष्ट नाम आहे हे त्याच्या लक्षात येते. त्यातून त्याला त्याच्या विशिष्ट नावाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. पुढे ते मूल कुठल्याही अन्य भाषा शिकले तरी त्याच्या मनावर जो पगडा आणि प्रभाव असतो तो त्याच्या मातृभाषेचाच असतो.

मातृभाषेचे महत्व हे जसे इतर समभाषिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी असते, तसेच व्यक्तीची जाणीव विकसित होण्यामध्ये असते. एखाद्या गोष्टीची माहिती करून घेतल्यावर ती जाणवण्याची जी प्रक्रिया होत असते ती त्याच्या मातृभाषेतून होत असते. बरेचदा उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी परभाषिक प्रांतात जावे लागल्यानंतर सोयीसाठी आपल्याला तिथली भाषा शिकावी लागते. काही लोक तर बहुभाषिक असतात, पण अशाही लोकांची एखादी मूळ भाषा म्हणजेच मातृभाषा असतेच. त्या भाषेचा त्याला त्याग करता येत नाही. पेशवाईतील नाना फडणवीसांचा एक किस्सा सांगितला जातो, एक बहुभाषिक पंडित त्यांच्या भेटीला येतो. त्यांना आव्हान देतो की, तुम्ही अतिशय हुशार आहात, अशी तुमची किर्ती आहे तर मग माझी मातृभाषा कोणती ते ओळखून दाखवा. त्यानंतर नाना ते आव्हान स्वीकारतात. नाना त्याची चांगली राहण्या-खाण्याची सोय करतात. थंडीचे दिवस असतात. रात्रीच्या वेळी तो पंडित गाढ झोपलेला असतो. नाना त्याच्या जवळ जाऊन त्याच्या अंगावर थंड पाण्याचे मोठे भांडे रिकामे करतात. अचानक थंड पाणी अंगावर पडल्यावर तो, मेलो मेलो वाचवा, असे ओरडत उठतो. त्यानंतर नाना त्याला सांगतात, तुझी मातृभाषा मराठी आहे. त्यानंतर तो पंडित मान्य करतो की, त्याची मातृभाषा मराठीच आहे. हा किस्सा सांगण्याचा हेतू हाच आहे की, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते, तेव्हा माणसाला आपली मातृभाषा, आपला गाव, आपली माणसे, आपला देश आठवतो. याचा अनुभव अनेकांनी कोरोना काळात घेतला.

- Advertisement -

मराठी भाषेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो. शासकीय पातळीवर मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पण एका बाजूला मराठी माणसांना आपल्या भाषेबद्दल आपलेपणा वाटतो, पण त्याच वेळी आपल्या मुलांनी जागतिक स्पर्धा करावी असे पालकांना वाटत आहे. त्यामुळे ते आपल्या मुलांना मराठी माध्यमांकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालतात. इंग्रजी भाषा शिकण्याच्या नादात सगळ्या मराठी भाषेवर वरवंटा फिरवला जात आहे. कारण इंग्रजी माध्यमात मुलांना थेट इंग्रजीत शिकवले जाते, त्यांना मराठीतून इंग्रजी असे शिकवले जात नाही. त्यामुळे आपल्या मातृभाषेत त्या वस्तूला काय म्हणतात ते त्यांना कळत नाही. घरात आंबा या फळाला आंबा म्हणत असतील, पण त्याच फळाला इंग्रजी शाळेत थेट मँगो असे म्हटले जाते. त्यामुळे बरेचदा मुलांचा गोंधळ उडतो. विविध भाषा अवगत असल्या तर उत्तमच आहे, ते व्यक्तीच्या फायद्याचे असते. पण आपल्या मातृभाषेच्या संदर्भातच या सगळ्या भाषांचा तो माणूस विचार करत असतो. त्यामुळे त्याच्या मातृभाषेला विशेष महत्व असते.

अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या विषयांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुलांना पुढील आयुष्यात भरपूर पैसा कमवायचा असेल, जीवनात स्थैर्य मिळवायचे असेल तर विविध तंत्रज्ञानांचे विषय आत्मसात करावे लागतात. मोठ्या प्रमाणात बाजारीकरण वाढत आहे. विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. कंपन्यांना आपली उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवून अधिक नफा कमवायचा आहे. कॉलेजमध्येही पीसीएम आणि पीसीबी या विषयांना अधिक पसंती मिळते. भाषा विषय मागे पडताना दिसतात. भौतिकशास्त्रे, वैद्यकशास्त्र यांना अधिक महत्व मिळत आहे. हे करताना विद्यार्थी हे विसरत आहेत की, एखाद्या डॉक्टरला रुग्णाला काय त्रास होतो हे जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या मातृभाषेत म्हणजेच त्याला समजणार्‍या भाषेत त्याला विचारावे लागतेे. त्याशिवाय तो त्याला योग्य उपचार देऊ शकणार नाही. वाढत्या तंत्रज्ञानाच्या काळात आता थेट भाषेपेक्षा सांकेतिक एमोजींकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.

आज आपण पाहतो मराठी माणसे देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि विविध देशांमध्ये गेलेली आहेत. तिथे ते आपले विविध मराठी उत्सव साजरे करतात. म्हणजे पोटापाण्यासाठी आणि नशीब काढण्यासाठी माणूस आपले ठिकाण बदलतो, पण आपली संस्कृती त्याला बदलणे अवघड असते. कारण ती काही पिढ्यांपासून आपल्यामध्ये भिनलेली असते. मराठी भाषेची किंमत ही महाराष्ट्रापासून दूर असल्यावर कळते. जेव्हा माणसावर आपत्कालीन परिस्थिती ओढवते तेव्हा त्याला आपल्या मातृभाषेची आठवण येते, त्यासाठी नाना फडणवीसांचा उपरोक्त किस्सा सांगितला आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा इथल्या सुधारकांनी त्यांच्या आधुनिक भाषेचे स्वागत केले, पण जशी त्या भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक गुलामी लादली जाऊ लागली, तसे याच सुधारकांकडून इंग्रजांना विरोध व्हायला लागला. त्यातून स्वदेश आणि स्वभाषा यांची जाणीव आणि जागृती झाली.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -