घरपालघरमहाराष्ट्रातील पहिले ’वारकरी भवन’ मीरा भाईंदरमध्ये, इंदुरीकर महाराजांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्रातील पहिले ’वारकरी भवन’ मीरा भाईंदरमध्ये, इंदुरीकर महाराजांच्या हस्ते भूमिपूजन

Subscribe

तर आणखी १ कोटी निधीची मंजुरी आणलेली आहे. एकूण २ कोटी रुपये निधी खर्च करून हे वारकरी भवन पुढील एक वर्षात बांधून तयार होणार आहे.

भाईंदर : मीरा- भाईंदरमध्ये उभ्या राहणार्‍या ’वारकरी भवना’च्या कामाचे भूमिपूजन ३ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी ह.भ.प. इंदुरीकर महाराज उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील पाहिले आगळे वेगळे व भव्य असे वारकरी भवन मीरा भाईंदर शहराच्या हद्दीत आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उभे राहत आहे. मीरा- भाईंदरमध्ये वारकरी संप्रदायाला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात असून गेले अनेक वर्षे ’वारकरी भवन’ शहरात मंजूर व्हावे अशी भक्तांची मागणी होती. ही मागणी आमदार सरनाईक यांनी मान्य केली असून त्यांच्या संकल्पनेतून वारकरी भवनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. हायवेजवळ मान डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर हे वारकरी भवन उभे राहणार असून तळ अधिक पहिला मजला असे त्याचे स्वरूप असणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून आमदार सरनाईक यांनी १ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. तर आणखी १ कोटी निधीची मंजुरी आणलेली आहे. एकूण २ कोटी रुपये निधी खर्च करून हे वारकरी भवन पुढील एक वर्षात बांधून तयार होणार आहे.

या वारकरी भवनाचे भूमिपूजन ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता इंदुरीकर महाराजांच्या हस्ते होणार असून त्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात इंदुरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होणार आहे. टाळ – मृदूंग आणि हरिनामाच्या गजरात हे भूमिपूजन पार पडणार आहे. मीरा-भाईंदर शहरातील वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी , भजनी मंडळी , कीर्तनकार , भक्तिमार्गातील सगळेच लोक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.मीरा भाईंदरची ही वारकरी भवन वास्तू तयार झाल्यानंतर वारकरी संप्रदायातील वारकर्‍यांना हक्काची एक जागा मिळणार आहे. भजन, कीर्तन, धार्मिक सोहळे, वार्षिक धार्मिक कार्यक्रम यासाठी येथे सभागृह उपलब्ध होईल. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत साहित्य, वारकरी संप्रदाय याबाबत येथे नवीन तरुणांना मार्गदर्शन मिळेल. अनेक नवीन कीर्तनकार, प्रवचनकार तयार होण्यासाठी या वारकरी भवनातून त्यांना आवश्यक ते सहकार्य दिशा मार्गदर्शन केले जाईल , असे आमदार सरनाईक म्हणाले.

- Advertisement -

संत साहित्याचे ग्रंथालय उभारण्याचाही मानस

या वारकरी भवनात कीर्तनकार, प्रवचनकार व संत साहित्याची ज्यांना माहिती हवी आहे. त्यांच्यासाठी संत साहित्याचे ग्रंथालय तयार करण्याचाही आमदार सरनाईक यांचा मानस आहे. अध्यात्मिक अभ्यास करणार्‍यांसाठी या ग्रंथालयाचा उपयोग होईल. तरुण पिढीला आध्यात्मिक ग्रंथाची नीटपणे ओळख त्यामुळे होऊ शकेल. वारकरी भवनाची संकल्पना नवीन पिढीला मार्गदर्शक ठरेल. तसेच कीर्तनकार , प्रवचनकार शहरात कीर्तन – प्रवचनासाठी आल्यास त्यांच्या राहण्यासाठी विश्राम व्यवस्था भवनात केली जाणार आहे. महाराष्ट्रात किर्तनाची मोठी परंपरा असून त्यामुळे या वारकरी भवनातून ’कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग’ चालवता येऊ शकतो का हे सुद्धा पाहणार आहोत. वारकरी भवन उभारल्यानंतर जास्तीत जास्त धार्मिक , समाज प्रबोधनाचे उपक्रम येथून चालवले जातील, असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले.
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -