डायल ११२ वर कॉल करत पोलिसांना दिली खोटी माहिती; पुढे झाले असे….

नियंत्रण कक्षाला घबराट पसवणारी खोटी माहिती देणे मुंबईतील एका इसमाच्या चांगलेच अंगलट आले. कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या इसमाला शोधून काढून न्यायालयापुढे हजर केले.

नियंत्रण कक्षाला घबराट पसवणारी खोटी माहिती देणे मुंबईतील एका इसमाच्या चांगलेच अंगलट आले. कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्या इसमाला शोधून काढून न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने ही बाब गंभीरपणे घेत त्या इसमाला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. २६ मे २०२२ रोजी सकाळी १०.२५ वाजता डायल ११२ या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर एका अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन कळवले की, सातिवली ते घोडबंदर असा लिक्विड एक्सप्लोझीवने भरलेला टँकर हायवे मार्गाने निघालेला आहे. या लिक्वीड एक्सप्लोझीवने भरलेल्या टँकरमुळे मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होवू शकते, अशा प्रकारची माहिती दिली.

पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षावरुन तात्काळ वालीव पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे यांना बिनतारी संदेशाद्वारे सतर्क करण्यात आला. या बातमीचे गांभीर्य व संवेदनशिलता लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे दोन पथके तयार करुन कथित लिक्वीड एक्सप्लोझीवने भरलेल्या टँकरचा शोध घेण्यासाठी एक पथक व नियंत्रण कक्ष डायल ११२ वर मिळालेल्या बातमीची खातरजमा करण्यासाठी दुसरे पथक रवाना करण्यात आले. डायल ११२ वर आलेल्या कॉलच्या तांत्रिक विश्लेषण व सुक्ष्मावलोकन पश्चात इसम नामे जमशेद अहमद असगराली चौधरी (रा. वालभट्ट रोड, कामा एस्टेट, सीएनजी पंपासमोर, राजीव गांधी नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई) याला वसई पूर्वस्थित गोलानी परिसरातून शोध घेवून ताब्यात घेण्यात आले.

जमशेद अहमद असगराली चौधरी याच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने खोडसाळपणे पोलिसांना त्रास देण्यासाठी डायल ११२ ला फोन करुन खोटी माहिती दिल्याची कबुली दिली. पोलीस नियंत्रण कक्षास फोन
करुन जाणीवपूर्व खोडसाळपणे खोटी माहिती दिल्याप्रकरणी जमशेद अहमद असगराली चौधरी याच्याविरुद्ध वालीव पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. डायल ११२ हा आपत्कालीन सेवा क्रमांक असल्याने या क्रमांकावर कुणीही आगळीक करण्याच्या हेतूने किंवा खोडसाळपणाने माहिती देवून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा –

राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस