घरपालघरशिक्षणाचे दलाल घुसले जव्हारपर्यंत पार

शिक्षणाचे दलाल घुसले जव्हारपर्यंत पार

Subscribe

त्याचीच पाळेमुळे जव्हार तालुक्यात जोडली गेली असून अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

जव्हार: विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शालेय शिक्षण व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत सन 2014 पासून टीईटी परीक्षा सुरू करण्यात आली. ही परीक्षा पास होणे शिक्षकांकरिता बंधनकारक असल्याने संपूर्ण राज्यभर टीईटी पास करून देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांकडून अनेक दलालांनी लाखो रुपये घेऊन गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला आहे. त्याचीच पाळेमुळे जव्हार तालुक्यात जोडली गेली असून अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणाचा दर्जा उच्च प्रतीचा असावा आणि देशाचा भावी नागरिक घडत असताना, सर्वांगीण पैलू लक्षात घेत शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले. परंतु ही परीक्षा अवघड असून प्रत्येक वेळा परीक्षा देण्यापेक्षा एकदाच काही पैसे देऊन पास करण्याचे आमिष दलालांनी विद्यार्थ्यांना दाखवले होते.
त्यानंतर परीक्षेचा निकाल हाती आला असून कोणताही विद्यार्थी या दलालांना दिलेल्या पैशाद्वारे पास झाला नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जव्हार तालुक्यातील एका शिक्षकाने आणि काही व्यक्तींनी शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवून लाखो रुपये उकळले आहेत.याचा पुरावा म्हणून टेलिफोन संभाषण प्राप्त व्हावेत यासाठी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पालकांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या दलालांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा रोष पालक वर्गातून व्यक्त करण्यात येत असून वेळ आल्यास आम्ही स्वतः पुरावे दाखल करू असे देखील पालक बोलत आहेत.काही पालकांनी नाव न सांगता हा सगळा प्रकार उघडकीस आणला आहे.

जव्हार तालुक्यात महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात येणारी टीईटी परीक्षा पास करून देण्यासाठी जवळपास 500 विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये दलालांनी हडप केल्याची मौखिक तक्रार करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पोलीस व जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निवेदन देणार आहोत.
– इम्रान कोतवाल, संभाजी ब्रिगेड,
उपाध्यक्ष, पालघर जिल्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -