Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरयेशूच्या तत्वज्ञानात लोकशाहीची संकल्पना

येशूच्या तत्वज्ञानात लोकशाहीची संकल्पना

Subscribe

स्रिया, दलित आणि आजारग्रस्तांना तर जगण्याची हमी नसताना येशू ख्रिस्ताने धर्म माणसाच्या मुक्तीसाठी आहे, त्याला बंधनात जखडण्यासाठी नाही असे नवीन मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडले.

वसईः येशू ख्रिस्ताने स्वातंत्र्य, समता,बंधुता,करुणा,अहिंसा आणि क्षमा या मूल्यांची पुनर्स्थापना केली. आधुनिक लोकशाहीची संकल्पना येशूच्या तत्त्वज्ञानात अधोरेखित झालेली आहे. परिघाबाहेरच्या दलित, वंचित समाजासाठी येशूचा लढा होता. तो जसा जगला तोच नवीन धर्म म्हणून उदयाला आला. आधी केले मग सांगितले हे येशूच्या जीवनाचे सार सर्वस्व आहे, असे प्रतिपादन साहित्यिक सायमन मार्टिन यांनी नंदाखाल विरार पश्चिम येथे सायमन लोबो लिखित देवाचे मंदिर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज होते. ज्यू नावाचा जगातील पुरातन धर्म रूढी, परंपरा आणि कठोर नियम नियमात अडकून पडलेला होता. सर्वसामान्य जनतेला अस्तित्वच नव्हते. स्रिया, दलित आणि आजारग्रस्तांना तर जगण्याची हमी नसताना येशू ख्रिस्ताने धर्म माणसाच्या मुक्तीसाठी आहे, त्याला बंधनात जखडण्यासाठी नाही असे नवीन मुक्तीचे तत्त्वज्ञान मांडले.

आपल्या प्राणाची किंमत देऊन येशू ख्रिस्ताने सर्वसामान्य माणसाला धर्म आणि जगण्याच्या केंद्रस्थानी आणले, असेही मार्टीन यांनी पुढे बोलताना सांगितले. जेथे माणसाला आत्मशांती मिळते ते देवाचे मंदिर. धर्माने माणसा माणसात पूल बांधले तरच मानवधर्म खर्‍या अर्थाने अस्तित्वात येईल, असे फादर ज्यो आल्मेडा यावेळी बोलताना म्हणाले. दुःख भोगणारे, संकटग्रस्त व अभावग्रस्तांसाठी येशूचा धर्म आहे. येशू केवळ ख्रिस्ती जनतेचा नसून तो सार्‍या विश्वाचा आहे. कारण येशू म्हणजे माणसाला माणूसपण बहाल करणारा महामंत्र आहे, असे फादर अण्ड्रयू रॉड्रिग्ज यांनी अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले. डोरा रॉड्रिग्ज यांनी प्रास्ताविक भाषण, रॉबर्ट लोबो यांनी सूत्रसंचालन तर डायगो लोबो यांनी आभार मानले. लिसा मचाडो यांनी प्रार्थना गीत सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -