घरपालघरबोईसर ग्रामीण रुग्णालय इमारतीचा तिढा सुटणार कधी?

बोईसर ग्रामीण रुग्णालय इमारतीचा तिढा सुटणार कधी?

Subscribe

२००६ पासून मंजूर ग्रामीण रुग्णालय इमारतीची २०१२ मध्ये लोकवर्गणीतून दुरुस्ती केली होती. बोईसर नवापूर रोड येथील बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने तेथून रुग्णालय तारापूर येथे हलवण्यात आल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

बोईसर : बोईसरजवळील सरावली येथील संजयनगरात ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी २०२१ मध्ये जागा वर्ग केली आहे. याठिकाणी ३० खाटांच्या रुग्णालयासाठी २२.५८ कोटींचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे. पण, रुग्णालयाच्या इमारतीचा तिढा कायम आहे. २००६ पासून मंजूर ग्रामीण रुग्णालय इमारतीची २०१२ मध्ये लोकवर्गणीतून दुरुस्ती केली होती. बोईसर नवापूर रोड येथील बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने तेथून रुग्णालय तारापूर येथे हलवण्यात आल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कोव्हिड काळात सप्टेंबर २०२० मध्ये टीमा रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टीमामध्येच ग्रामीण रुग्णालयासाठी २३ खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे टीमामधील ज्या इमारतीत ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले आहे, त्याचे छप्परही गळके असून पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असते. ही जागाही तात्पुरती असून १६ सप्टेंबर २३ मध्ये मुदत संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत इमारतीचे बांधकाम सुरु झाले नाही तर ग्रामीण रुग्णालयासाठी नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

बोईसर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून या भागात नागरीकरण देखील वाढले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या मोठी असताना ग्रामीण रुग्णालयाला स्वतंत्र इमारत मिळू शकलेली नाही. इमारतीचा प्रश्नही रेंगाळत असताना याठिकाणी अधिकारी, कर्मचार्‍यांची २५ पैकी १७ पदे रिक्त आहेत. सहा जण प्रतिनियुक्तीवर काम करत असून कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे कामाचा बोजा कार्यरत कर्मचार्‍यांवर पडत आहे. बोईसर येथील संजयनगर येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र, त्या कामालाही मंजुरी मिळालेली नसल्याने इमारती तिढा अद्याप कायम आहे. दुसरीकडे, बोईसर येथे जिंदाल कंपनीकडून १०० खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय बांधून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु जागेअभावी तेही काम रखडून पडले आहे.

प्रतिक्रिया

- Advertisement -

ग्रामीण रुग्णालय संजयनगर येथे ३० खाटांचे लवकरात लवकर चालू करून बोईसर येथील नागरिकांना पुरेसा लाभ घेता येईल.

—डॉ. मनोज शिंदे, वैदयकीय अधीक्षक, बोईसर रुग्णालय

०००

सार्वजनिक आरोग्य विभागाने निधी उपलब्ध करून दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग काम हाती घेईल. त्यानंतर लवकरात लवकर काम चालू केले जाईल.

—- सचिन पाटील, कार्यकारी अभियंता, सा. बां. विभाग पालघर

०००

बोईसर रुग्णालयात दोन दिवसांपासून ताप, खोकला असल्याने उपचार घेत आहे. वॉर्डमधील छप्पर गळके असल्याने पाणी गळत असते. तसेच नियमित आणि नीट साफसफाई केली जात नाही.

— अनुराधा सिंग आणि तुलसी सिंग (रुग्ण)

०००

२००६ मंजूर रुग्णालयाची २०१२ लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्यात आली. जागा उपलब्ध होत नसल्याने इमारतीचे काम रखडले आहे. सरावली हद्दीतील संजयनगरमध्ये ३० खाटांचे रुग्णालय असून बोईसर येथे १०० खाटांच्या रुग्णालयाची गरज आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

— जगदीश धोडी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख

०००

रुग्णालयाचा आराखडा तयार झाला आहे. त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून इमारत बांधण्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे.

—-राजेश पाटील ,आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -