विमानप्रवासात मास्क वापरणे सक्तीचे डीजीसीएचे एअरलाइन्स कंपन्यांना निर्देश

kolhapur municipal corporation advises people to wear mask while at home
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअरलाइन्स कंपन्यांना कोरोनाविषयक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विमानप्रवासात आता प्रवाशांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. त्याचे नवे रुग्ण दररोज सापडतच आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड याबरोबरच आता कॉर्बोव्हॅक्स ही लस घेता येऊ शकते, असे नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाप्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना एअरलाइन्स कंपन्यांना दिल्या आहेत. विमानप्रवासात नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारकग असून त्यांचे योग्य प्रकारे सॅनिटाइझ करणे आवश्यक आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित एअरलाइन्सने त्या प्रवाशावर कडक कारवाई करावी, असे निर्देश डीजीसीएने दिले आहेत.

देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या 9 हजारांच्या घरात
देशभरात मंगळवारी 9 हजार 62 नव्या कोरोना रुग्णांनी नोंद झाली. पण त्याचबरोबर नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 15 हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात 2182 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 1800 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण 2182 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 79,16,615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 11 हजार 370 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5194 रुग्ण आहेत. तर, राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.