घरपालघरवैतरणा ते डहाणू लोकल वेळापत्रक रूळावर कधी येणार ?

वैतरणा ते डहाणू लोकल वेळापत्रक रूळावर कधी येणार ?

Subscribe

मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोरोना काळात बंद केलेल्या महत्त्वपूर्ण गाड्या, अपुर्‍या लोकल गाड्या तसेच विविध समस्यांमुळे प्रवाशांचे बेहद हाल होत असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही येथील प्रवासी उपेक्षितच आहे.

नवीन पाटील / सफाळे: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते डहाणू या मार्गावर लोकल वाहतूक सुरू व्हावी याकरिता शासन दरबारी विविध मागण्या व अनेक आंदोलन केल्यानंतर १० वर्षांपूर्वी चर्चगेट डहाणू लोकल सुरू करण्यात आली. उपनगरीय लोकल वाहतूक सेवा सुरू झाल्याने येथील प्रवाशांमध्ये आनंद निर्माण झाला होता मात्र, तो आनंद फार कमी काळ टिकला. दैनंदिन वाढत्या शहरीकरणामुळे येथील सर्वच स्थानकातील प्रवासी संख्येत वाढ झाली. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोरोना काळात बंद केलेल्या महत्त्वपूर्ण गाड्या, अपुर्‍या लोकल गाड्या तसेच विविध समस्यांमुळे प्रवाशांचे बेहद हाल होत असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही येथील प्रवासी उपेक्षितच आहे.

पश्चिम रेल्वेच्या विरार पुढील मार्गावर वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू अशी आठ स्थानके येतात. या सर्व स्थानकांतून दररोज ५० ते ६० लाखांहून अधिक प्रवासी नोकरी, धंदा, शिक्षण आदींसाठी प्रवास करीत आहेत. या प्रवाशांच्या दैनंदिन तिकीटातून मासिक पासातून तसेच लांबपल्ल्याचे आरक्षण आदीतून रेल्वेला मोठे उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र असे असतानाही अनेक रेल्वे स्थानकातील मूलभूत सोयीसुविधांचा बोझवाराच उडाला आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही रेल्वे गाड्या अपुर्‍या पडत आहेत. पहाटेच्या सुमारास एक्सप्रेस गाड्यांना वेळेत पोचण्यासाठी स्थानिक गाड्यांना सायडिंगला काढणे, अनेकदा उशिराने धावणार्‍या गाड्या, कधीकधी त्यामध्ये झालेला तांत्रिक बिघाड या सर्वांमुळे दैनंदिन नोकरदारवर्ग, भाजी विक्रेत्या महिला, विविध आस्थापनांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना आपापल्या कामावर वेळेत पोहोचता येत नसल्याने अतोनात हाल होत आहेत.

- Advertisement -

महत्वाच्या गाड्यांमध्ये अर्धा ते पाऊण तासांचे अंतर

आजच्या घडीला विरार ते डहाणू मार्गावर शटल, लोकल व पेसेंजरच्या अप व डाऊन अशा एकूण ३१-३१ फेर्‍या सध्या उपलब्ध आहेत. मात्र सकाळच्या व सायंकाळच्या समयी काही गाड्यांमध्ये १५ ते २० मिनिटांचे अंतर असून ज्या गाड्यांचा वापर नोकरदार व विद्यार्थी वर्गाला जास्त होतो, त्या वेळेतील गाड्यांमध्ये अर्धा ते पाऊण तासांचे अंतर ठेवले आहे. बलसाड फास्ट पॅसेन्जर सारख्या महत्वाच्या गाड्यांना अनेकदा सायडिंगला काढले जाते. अशा विविध कारणांमुळे नोकरदारवर्गाला कामावर जाण्यास विलंब होऊन लेटमार्क लागतो. त्यामुळे या मार्गावर नव्याने गाड्या वाढवाव्या किंवा फेर्‍यांचे पुन्हा वेळापत्रक करावे अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंतच्या सर्व उपनगरीय गाड्या त्यांनीच बनवलेल्या वेळापत्रकानुसार कुठलेही किंतु परंतु न आणता चालवाव्यात. नकारात्मक धोरण बाजूला सारून वैतरणा ते डहाणू दरम्यान लवकरात लवकर नवीन फेर्‍या वाढवण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वे डहाणू प्रवाशांकडे सहानुभूती पूर्वक पाहून येणार्‍या सुधारित वेळापत्रकात या अतिरिक्त फेर्‍यांचा नक्कीच विचार करेल ही अपेक्षा.
– नागदेव पवार,अध्यक्ष
डहाणू -वैतरणा, प्रवासी सेवाभावी संस्था.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर आणि विरार – डहाणू चौपदरीकरण प्रकल्पांचे काम सुरू असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुढील दोन वर्षांनी १०-१० मिनिटांनी गाड्या उपलब्ध होतील. तूर्तास वैतरणा ते डहाणू परिसरातील प्रवाशांच्या समस्या लक्षात घेता, लोकल ट्रेनच्या फेर्‍या वाढविण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे माझा पाठपुरावा सुरू असून लवकरच येथील प्रवाशांच्या समस्या सुटतील.
– खासदार, राजेंद्र गावित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -