घररायगडआशा स्वयंसेविकांना अँटिजेन चाचणी प्रशिक्षण

आशा स्वयंसेविकांना अँटिजेन चाचणी प्रशिक्षण

Subscribe

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असताना पुढील कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, याचा संसर्ग विशेषतः लहान मुलांमध्ये होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटिजेन चाचणी प्रशिक्षण आणि कोरोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांना दिले आहेत.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. जिल्ह्यात सद्यःस्थितीत १ हजार ७२७ आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत मागील वर्षात जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत व्यापक जनजागृती करून प्राथमिक तपासणीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कोविड विषाणूंचा ग्रामीण भागात होणारा प्रसार थोपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण आणि चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांना रॅपिड अँटिजेन चाचणी प्रशिक्षण आणि कोरोना वैयक्तिक सुरक्षितता किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत अशा गावात ग्रामसेवक, सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता गाव पातळीवर गठीत केलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने विशेष चाचणी कॅम्प आणि लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे, जिल्ह्यातील सर्व गावे कोविड मुक्त ठेवण्याचा प्रयत्न कसोशीने करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -