घररायगडशासनाच्या पाईप मोर्‍यांचा खासगी कारणासाठी वापर

शासनाच्या पाईप मोर्‍यांचा खासगी कारणासाठी वापर

Subscribe

फार्म हाऊस मालकासाठी जलसंपदा विभागाचे रेड कार्पेट

कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध पाली भुतिवली धरणाच्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील पाईप मोर्‍या चक्क तेथील एका फार्महाउस मालकाने स्वतःसाठी वापरल्या आहेत. मात्र झोपेचे सोंग घेतलॆल्या जलसंधारण विभागाने याकडे दुर्लक्ष करीत रेड कार्पेट अंथरल्याचा प्रकार समोर येत आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन भविष्यात तालुक्यातील शेती ओलिताखाली आणण्याच्या दृष्टीने या धरणाची निर्मिती झाली. यासाठी तीन गावे स्थलांतरित करण्यात आली असून, परिसरातील १५ गावांमधील ११०० हेक्टर ज़मीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. १९९२ मध्ये धरणाचे काम सुरू झाले आाणि मुख्य भिंत २००४ मध्ये पूर्ण झाल्यानंतर धरणात पाणीसाठा झाला. मात्र तेव्हापासून आजतागायत धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याकरिता कालवे बांधण्यात आलेले नाहीत. पाटबंधारे खात्याला इतक्या वर्षांत कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा, तसेच डावा असे १५ किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण होऊ शकले नाहीत. परिणामी धरणाचे पाणी शेतीसाठी येत नाही अशी भूमिका पाटबंधारे विभाग घेत असते.

- Advertisement -

या धरणातील पाणीसाठा मृतसाठा असला तरी मध्यंतरी या धरणातील पाणी पाटबंधारे खात्याने एका बिल्डरला दिले होते. अशातच आता धरणाच्या खालच्या बाजूला जेथून कालवे काढले जाणार होते त्या ठिकाणी एका व्यक्तीचा फार्महाऊस उभारला जात आहे. यासाठी जलसंधारण विभागाच्या पाईप मोर्‍या सर्रास वापरल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर प्रस्तावित धरणाच्या कालव्यांचे मार्ग वळवण्याचा उद्योग देखील या महाभागाकडून करण्यात आला आहे. मात्र या सगळ्याकडे जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे खात्याचे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

गेले अनेक दिवस या मोर्‍या वळवून खासगीसाठी वापरल्या जात आहे. परंतु तरीही त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आहे. कर्जत येथील जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे खात्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता उप अभियंता प्रत्यक्ष किंवा फोनवर भेटू शकले नाहीत. पाटबंधारे विभागाने फार्महाऊस मालकालासाठी रेड कार्पेट अंथरल्याच्या चर्चांना आता ऊत आला आहे. त्यामुळे याबाबत नेमकी कोणती कारवाई होणार, की नेहमीप्रमाणे हे प्रकरण गुंडाळले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -