घररायगडकिल्ले रायगडावर सोयी सुविधा नसल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल

किल्ले रायगडावर सोयी सुविधा नसल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल

Subscribe

महाड-: ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यास शैक्षणिक सहलींची संख्या वाढू लागली आहे. दररोज जवळपास ३० ते ४० शैक्षणिक सहलींच्या गाड्या दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे सलग सुट्या आणि शनिवार-रविवार या दोन दिवशी शिवप्रेमी, पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. मात्र येथील सोयीसुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. (Historical fort Raigad is in dire straits due to lack of amenities) राहण्याची असुविधा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि मुलींचे हाल होत आहेत.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे स्थळ असलेल्या किल्ले रायगडावर येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले महत्त्व पाहून राज्य शासनाने रायगडचा परिसर आणि गड विकासीत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्राथमिक स्वरुपात जरी कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये कोणत्याच सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रायगड आणि सभोवतालच्या परिसरामध्ये असंख्य अडचणी असताना शासनाला त्या सोडविण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळे राज्यभरातून येणार्‍या लाखो पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.काहीजण रोप वेचा, तर अनेकजण पायी जाण्याचा पर्याय निवडतात. यामुळे आधीच अरूंद असलेल्या पायथ्याच्या मार्गावर वाहन कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला मोठी वाहनांसह छोट्या कार उभ्या केल्या जात असल्याने वाहन कोंडी होत आहे.याकरिता स्थानिक पोलीस कर्मचारी ट्रॅफिक नियोजन करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

  1. पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते
    रायगड प्राधिकरणच्या माध्यामातून करोडो रुपये दुरुस्ती आणि इतर कामांवर खर्ची घातले जात आहेत. गेल्या ५ वर्षांपासून प्राधिकरण याठिकाणी काम करीत आहे. गडावर पाण्याचा थेंब नसल्याने येणार्‍या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. मात्र तलाव दुरुस्ती, नळ जोडण्या आदी कामासाठी विलंब लागत असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने येणार्‍या पर्यटकांना पिण्याचे पाणी मात्र विकतच घ्यावे लागत आहे.
  2. स्वच्छतागृहाच्या नावे पैसे उकळले
    स्वच्छतागृह तसेच पडून आहे. जिजामाता समाधी स्थळ, किल्ले रायगड आदी ठिकाणी स्वच्छतागृह उभे केले असले तरी पाण्याअभावी महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. स्थानिक व्यवसायिक मात्र पाणी नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पैसे उकळत आहेत.
  3. पर्यटकांच्या धर्मशाळेला टाळे;कचर्‍याचे साम्राज्य
    किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली धर्मशाळा आहे. याची दुरवस्था झाल्याने प्राधिकरणच्या माध्यामतून धर्मशाळेची दुरुस्ती करण्यात आली. मात्र अद्याप ही धर्मशाळा पर्यटक किंवा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही.धर्मशाळेला प्रशस्त हॉल आणि सहा छोट्या खोल्या आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छता नसल्याने कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -