घरक्रीडाआर्सनलची मँचेस्टर युनायटेडवर मात

आर्सनलची मँचेस्टर युनायटेडवर मात

Subscribe

प्रीमियर लीग 

पूर्वार्धातील उत्कृष्ट खेळाच्या जोरावर आर्सनल संघाने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडवर २-० अशी मात करत नव्या वर्षाची विजयी सुरुवात केली. नवे प्रशिक्षक मिकेल आर्टेटा यांच्या मार्गदर्शनात आर्सनलचा हा पहिला, तर मागील १६ सामन्यांतील केवळ दुसरा विजय ठरला. या विजयामुळे आर्सनलचा संघ २७ गुणांसह प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात दहाव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडचा संघ २१ सामन्यांत ३१ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आर्सनलने आक्रमक खेळ करत मँचेस्टर युनायटेडवर वर्चस्व प्रस्थापित केले. याचा फायदा त्यांना आठव्या मिनिटाला मिळाला. निकोलस पेपेने गोल करत आर्सनलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पेपेचा हा यंदाच्या मोसमातील केवळ तिसरा गोल होता. आर्सनलने पुढेही आक्रमण सुरू ठेवले. स्ट्रायकर अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेट, ल्युकास टॉरेरा आणि पेपे यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण तिघांनाही गोल करण्यात अपयश आले. मात्र, ४२ व्या मिनिटाला सॉक्राटिसने गोल करत आर्सनलची आघाडी दुप्पट केली. ही आघाडी मध्यंतरापर्यंत राखण्यात त्यांना यश आले. उत्तरार्धात मँचेस्टर युनायटेडचे खेळाडू खेळात सुधारणा करतील, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, तसे झाले नाही. आर्सनलने भक्कम बचाव करत हा सामना २-० असा जिंकला.

- Advertisement -

दुसरीकडे नवे प्रशिक्षक डेविड मॉईस यांच्या मार्गदर्शनात पहिल्यांदा खेळताना वेस्ट हॅम युनायटेडने बॉर्नमथ संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. वेस्ट हॅमकडून कर्णधार मार्क नोबलने दोन, तर सेबॅस्टियन हॉलर आणि फिलिपे अँडरसन यांनी प्रत्येकी एक गोल केला. तसेच लेस्टर सिटीने आयोझे पेरेझ, जेम्स मॅडिसन आणि हमझा चौधरी यांच्या गोलमुळे न्यूकॅसल युनायटेडचा ३-० असा पराभव केला. टॉटनहॅमला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. साऊथहॅम्पटनने त्यांच्यावर ०-१ अशी मात केली.

मँचेस्टर सिटीचा विजय

गॅब्रियल जेसूसच्या दोन गोलमुळे गतविजेत्या मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीगच्या सामन्यात एव्हर्टन संघावर २-१ असा विजय मिळवला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, मध्यंतरानंतर सामन्यात रंगत आली. ५१ आणि ५८ व्या मिनिटाला जेसूसने गोल करत सिटीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एव्हर्टनने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ७१ व्या मिनिटाला रिचार्लसनने त्यांचा पहिला गोल केला. मात्र, पुढे त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने सिटीने हा सामना २-१ असा जिंकला. हा सिटीचा २१ सामन्यांतील १४ वा विजय होता. त्यामुळे त्यांचा संघ ४४ गुणांसह प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -