घरक्रीडाभारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सरस!

भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज सरस!

Subscribe

रिकी पॉन्टिंगचे उद्गार

विराट कोहलीच्या भारतीय क्रिकेट संघाने मागील काही वर्षांत खूप यश मिळवले आहे. भारताच्या या यशात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खासकरून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव या चौकडीने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानांवर आणि परदेशातही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांना रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा या फिरकीपटूंची चांगली साथ लाभत आहे. त्यामुळे भारताची गोलंदाजांची फळी सध्या जगातील सर्वोत्तम म्हणून ओळखली जाते. मात्र, भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाची गोलंदाजांची फळी सरस आहे, असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने केले.

मला गोलंदाजांची सर्वोत्तम फळी निवडायची झाल्यास मी कधीही ऑस्ट्रेलियाच्या फळीची निवड करेन. भारताकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. बुमराह आणि शमी यांनी मागील काही वर्षांत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यांच्याकडे उमेश यादव आणि इशांत शर्मा हे गोलंदाजही आहेत. तुम्ही या चौघांचा विचार केलात, तर भारताकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत, असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. त्यांना अश्विन आणि जाडेजा उत्तम साथ देत आहेत. मात्र, हे फिरकीपटू ऑस्ट्रेलियात यशस्वी होतील याबाबत मी साशंक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नेथन लायनने भारताच्या फिरकीपटूंपेक्षा कितीतरी पटीने चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्कच्या रूपात डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, जो भारताकडे नाही. स्टार्क सध्या अप्रतिम फॉर्मात आहे. त्यामुळे पुढील काळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धार अधिकच वाढणार आहे, असे पॉन्टिंगने नमूद केले.

- Advertisement -

संघात बदल होणे अवघड!

ऑस्ट्रेलियाने नुकतीच झालेली पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. त्यामुळे त्यांनी जागतिक स्पर्धेत १२० गुणांची कमाई केली. ऑस्ट्रेलियाची पुढील कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार असून या मालिकेला १२ डिसेंबरपासून सुरुवात होईल. पाकिस्तानविरुद्ध सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याने आता संघात बदल होणे अवघड आहे, असे पॉन्टिंग म्हणाला. तसेच त्याने पुढे सांगितले, ऑस्ट्रेलियात उष्ण हवामान नाही, पण खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. मात्र, गोलंदाज खूप मेहनत घेत आहेत आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -