घरक्रीडावसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारांहून अधिक स्पर्धक

वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये १८ हजारांहून अधिक स्पर्धक

Subscribe

यंदा वसई विरार महापौर मॅरेथॉन ८ डिसेंबरला पार पडणार असून यात १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. आशियाई मॅरेथॉन विजेता गोपी टी या मॅरेथॉनचा गेस्ट ऑफ ऑनर असणार आहे. या मॅरेथॉनमध्ये व्यावसायिक आणि हौशी अ‍ॅथेलिट्सच्या वेगवेगळ्या वयोगटासाठी ४५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच वसई, विरार परिसरातील स्पर्धकांसाठी खास बक्षिसे दिली जाणार आहेत.

यंदाच्या मॅरेथॉनमध्ये १८ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यापैकी ९०० स्पर्धक पूर्ण मॅरेथॉनमध्ये, ३ हजार ९०० स्पर्धक अर्ध मॅरेथॉनमध्ये, ३ हजार ४०० हून अधिक स्पर्धक ११ किमी शर्यतीत, १ हजार ५० स्पर्धक ५ किमी टाईम गटात आणि फॅमिली रन, तर धमाल धावमध्ये सुमारे दोन हजार स्पर्धक सहभाग नोंदवतील, असे आयोजकांचे म्हणणे आहे. १.५ किमी, ३ किमी, ५ किमी, ७ किमी आणि ११ किमी ज्युनियर गटातील स्पर्धेत ७ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. बॅटल रन या तीन सदस्यीय संघासाठी असलेल्या स्पर्धेसाठी ३० स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी २.५० लाख, तर पुरुष आणि महिला अर्ध मॅरेथॉनसाठी प्रत्येकी १.२५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटात बक्षिसे देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी होणार्‍या मॅरेथॉनसाठी आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन आणि ऑलिम्पियन गोपी टी याला आमंत्रित करण्यात आले आहे. आशियाई मॅरेथॉन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळणारा गोपी हा पहिला आणि एकमेव भारतीय आहे.

- Advertisement -

पूर्ण मॅरेथॉनला न्यू विवा कॉलेज, विरार पश्चिम येथून सकाळी ६ वाजता सुरुवात होईल. तर, अर्ध मॅरेथॉन वसई पश्चिम येथून सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. ११ किमी रनला न्यू विवा कॉलेजपासून सकाळी ६.१० वाजता सुरुवात होईल. तसेच ५ किमी टाईम रन सकाळी ७.२५ वाजता न्यू विवा कॉलेज येथून सुरू होईल. त्याचप्रमाणे सर्व ज्युनियर गटातील स्पर्धा, तसेच सिनियर सिटीझन रन आणि धमाल धाव न्यू विवा कॉलेज येथूनच सुरू होतील.

हे मॅरेथॉनपटू होणार सहभागी!
पूर्ण मॅरेथॉनमध्ये आर्मीचा राहुल पाल सहभागी होणार आहे. त्याला आर्मीचा सहकारी मोहित राठोडचे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर एएसआय पुणेचा ब्रह्मप्रकाश, एअर फोर्सचा सुखदेव सिंग, पंकज धाका, आर्मीचा रंजित मलिक व यूपीचा धर्मेंदर सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये गतविजेता शंकर मान थापाकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याला दुर्गा बहादूर, बीईजीचा अंकित मलिक, सिक्कीमचा अनिश थापा, आर्मीचा एल. रंजन सिंग हे स्पर्धक आव्हान देऊ शकतील. महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये आरती पाटील सहभागी होणार आहे. तिने गेल्यावर्षी तिसरे स्थान मिळवले.

- Advertisement -

स्पर्धेसाठी विशेष ट्रेन!
यंदा मॅरेथॉन स्पर्धेसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. ही ट्रेन सकाळी ३ वाजता चर्चगेट स्टेशनहून सुटेल आणि वसईला ४ वाजून २३ मिनिटांनी, तर विरारला ४ वाजून ३१ मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन सर्व स्टेशनवर थांबणार आहे. स्पर्धकांना वसई आणि विरार स्टेशनहून स्पर्धास्थळी पोहोचण्यासाठी निशुल्क वाहतुकीची सेवा देण्यात येणार आहे.

मॅरेथॉन मार्गावर वाहनांना बंदी!
मॅरेथॉन मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तशी अधिसूचना जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केली आहे. मात्र, वाहतूक नियंत्रण अधिसूचना फायरब्रिगेड, रुग्णवाहिका, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, महसूल विभाग, पोलीस विभाग, तालुका दंडाधिकारी, वसई विरार महापालिकेची वाहने, मॅरेथॉन स्पर्धेकरता दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -