घरक्रीडाIND vs ENG : भारतीय संघाला धक्का! 'हा' प्रमुख फलंदाज वनडे मालिकेतून...

IND vs ENG : भारतीय संघाला धक्का! ‘हा’ प्रमुख फलंदाज वनडे मालिकेतून आऊट

Subscribe

तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. 

भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला ६६ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर जायबंदी झाला. क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असून मिळालेल्या माहितीनुसार तो एकदिवसीय मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना किंवा संपूर्ण स्पर्धेला तो मुकण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. त्यामुळे त्याची उणीव दिल्लीला नक्कीच भासेल.

सूर्यकुमारला मिळणार संधी?

मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसला दुखापत झाली. इंग्लंडच्या डावात जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका त्याने सूर मारून अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी त्याचा डावा खांदा दुखावला. त्यानंतर भारतीय संघाचे फिजिओ त्याला घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचे समजले असून तो एकदिवसीय मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत खेळणार नाही. भारतीय संघाकडे मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचे पर्याय असल्याने भारताचा श्रेयसची फारशी उणीव भासणार नाही. मात्र, श्रेयसच्या अनुपस्थितीत आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्स अडचणीत सापडू शकेल.

- Advertisement -

दिल्लीला उणीव भासेल

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. श्रेयस कर्णधार असलेल्या दिल्लीच्या संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने मागील वर्षी आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. आता खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यास रिषभ पंत दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -