घरक्रीडाIND vs ENG : इंग्लिश फलंदाजांसाठी धोक्याची घंटा! अश्विनच्या कौंटी सामन्यात ७ विकेट

IND vs ENG : इंग्लिश फलंदाजांसाठी धोक्याची घंटा! अश्विनच्या कौंटी सामन्यात ७ विकेट

Subscribe

कसोटी मालिकेपूर्वी सराव मिळावा यासाठी अश्विनने कौंटी सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या परदेशातील कामगिरीबाबत नेहमीच चर्चा केली जाते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये अश्विनला फारशा विकेट घेता येत नाहीत अशी त्याच्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, आता अश्विनला टीकाकारांचे तोंड बंद करण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत अश्विनच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. या मालिकेपूर्वीच अश्विनने इंग्लिश फलंदाजांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळताना एका सामन्यात ७ विकेट (१/९९ आणि ६/२७) घेण्याची कामगिरी केली आहे.

दुसऱ्या डावात ६ विकेट 

कसोटी मालिकेपूर्वी सराव मिळावा यासाठी अश्विनने कौंटी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने सरे संघाचे प्रतिनिधित्व करताना सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात ७ विकेट घेण्याची कामगिरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनला ४३ षटकांत केवळ १ विकेट घेता आली. दुसऱ्या डावात मात्र त्याने सॉमरसेटच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. या डावात अश्विनने १५ षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट घेतल्या. कौंटी सामन्याच्या एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही अश्विनची सातवी वेळ ठरली.

- Advertisement -

सामना अनिर्णित राहिला

या सामन्यात सॉमरसेटने प्रथम फलंदाजी करताना ४२९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार जेम्स हिल्ड्रीथने १०७ धावांची खेळी केली होती. याचे उत्तर देताना सरेचा डाव २४० धावांत आटोपला. अश्विनच्या सहा विकेटमुळे सॉमरसेटचा संघ दुसऱ्या डावात केवळ ६९ धावांत गारद झाला. चौथ्या डावात २५९ धावांचा पाठलाग करताना सरेची ४ बाद १०६ अशी धावसंख्या असताना सामना थांबवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -