घरताज्या घडामोडीजगभरातील १११ देश तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीच्या टप्प्यात - WHO

जगभरातील १११ देश तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीच्या टप्प्यात – WHO

Subscribe

जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे मुख्य टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी डेल्टाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ पाहता जग आता तिसऱ्या लाटेच्या सुरूवातीच्या टप्प्यात येऊन पोहचले असल्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जगभरात डेल्टा व्हेरियंटची झालेली वाढ तसेच आरोग्याच्या दृष्टीने असातत्यपूर्ण अशा पद्धतीच्या उपाययोजना आणि वाढलेल्या वर्दळीमुळेच कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच कोरोनाच्या रूग्णांच्या मृत्यूमध्येही वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा जरी कमी झालेला असला दिसत होता. त्यासोबतच युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोरोना लसीकरणानंतर पुन्हा एकदा लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. यापुढच्या काळातही व्हायरसचे प्रमाण वाढतानाच आणखी व्हेरियंट समोर येतील असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे. सध्या डेल्टा व्हेरियंट हा १११ देशांमध्ये आहे. येत्या काळात हा व्हेरियंट आणखी मोठ्या प्रमाणात पसरणार असल्याचा अंदाज आहे. लागोपाठ चार आठवड्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ पहायला मिळाली आहे. त्यासोबतच सलग दहा आठवडे कोरोनाचे मृत्यूचे आकडे कमी झालेले असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे डब्ल्यूएचओने जाहीर केले होते.

- Advertisement -

कोरोना लसीच्या वितरणामध्येही मोठी तफावत असल्याचे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते. तसेच जीव वाचवणाऱ्या टूल्सच्या वितरणातही तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एकीकडे जगात असे काही देश आहेत ज्यांनी कोरोनाचा मुकाबला करत आता निर्बंध उठवण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे मात्र लोक कोरोनाच्या संकटामुळे नाईलाजाने मरणाच्या तोंडाशी आहेत ही तफावतही त्यांनी दाखवून दिली होती. तर अनेक देशांना कोरोनाची लसही मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. जागतिक आरोग्य संघटना म्हणून आपण जगभरातील लोकसंख्येच्या १० टक्के लोकांचे लसीकरण सप्टेंबर अखेरीस करण्याचे उदिष्ट जाहीर केले होते. तर २०२१ च्या अखेरीस हे उदिष्ट ४० टक्के इतके ठेवण्यात आले. तर २०२२ अखेरीस हेच उदिष्ट ७० टक्के इतके ठेवण्यात आले आहे. एकट्या लसीकरणामुळे कोरोनाची लाट नियंत्रणात राहणारी नाही. पण लसीचा पुरवठा सातत्याने व्हायला हवा असेही मत त्यांनी मांडले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -