घरक्रीडाभारत ७ - पाकिस्तान ०

भारत ७ – पाकिस्तान ०

Subscribe

भारत ७ – पाकिस्तान ० हा काही हॉकी सामन्याचा स्कोअर नाही, वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताने १९९२-२०१९ यादरम्यान तब्बल ७ वेळा पाकिस्तानला हरवण्याची किमया केली आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असल्याचे म्हटले जाते. १९८२ दिल्ली एशियाडमध्ये पाकिस्तानने भारतावर ७-१ असा मोठा विजय संपादला. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील एशियाड हॉकीची अंतिम झुंज पाहण्यासाठी दिग्गज मंडळी हजर होती. परंतु, यजमान भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, शिवाय भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

८० च्या दशकात क्रीडाक्षेत्रात (१९८३ वर्ल्डकप, १९८५ बेन्सन हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धेचा अपवाद वगळता) भारताच्या तुलनेत पाकचेच पारडे जड होते. मात्र, ९० च्या दशकापासून आजतागायत पाकच्या तुलनेत भारताचेच वर्चस्व राहिले आहे. क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत मँचेस्टरला याची प्रचिती आली. हॉकीतही भारताचेच वर्चस्व आहे. भुवनेश्वरमधील कलिंग स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५-१ असा विजय मिळवून एफआयएच सिरीज फायनल हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले!

- Advertisement -

सुनील गावस्कर, बिशन बेदी, वेंकटराघवन यांच्या जमान्यात भारतात वनडे क्रिकेटचा फारसा बोलबाला नव्हता. पाकिस्तानी क्रिकेटपटू मात्र इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत असल्यामुळे वनडेचे तंत्रमंत्र त्यांना अवगत होते. भारताच्या तुलनेत त्यांची गोलंदाजीही सरस, खासकरुन तेज, वेगवान गोलंदाजी! शिवाय अष्टपैलू खेळाडूंचा भरणाही पाकच्या संघात होता. ९० च्या दशकापासून मात्र हे चित्र बदलू लागले. सचिन, अझर, श्रीनाथ, वेंकटेशप्रसाद, गांगुली, कुंबळे, सेहवाग, द्रविड यांच्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य आले. पाकच्या तेज आक्रमणावर (वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर) प्रतिहल्ला करण्याची जिगर भारतीय फलंदाज दाखवू लागले.

महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेतील टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर, तसेच आयपीएलच्या उदयानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळात आणि मानसिकतेत प्रचंड फरक पडला. २००८ आयपीएलच्या उद्घाटनाच्या मोसमात पाक क्रिकेटपटूंनाही या स्पर्धेचे दरवाजे खुले झाले. परंतु, मुंबई बॉम्बस्फोटामुळे भारत-पाक संबंधात वितुष्ट आले. परिणामी भारत-पाक सामन्यांची संख्या रोडावली. पाक क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. दरम्यानच्या काळात श्रीलंकन संघ पाकिस्तान दौर्‍यावर असताना लाहोरमध्ये बसवरील प्राणघातक हल्यातून श्रीलंकन क्रिकेटपटू बचावले.

- Advertisement -

परंतु, परदेशी संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दर्शवल्यामुळे पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले. कराची, लाहोर, पेशावर, फैसलाबादऐवजी पाकिस्तान क्रिकेटचे सामने आखाती देशात (दुबई,आबुधाबी) खेळवण्यात येतात. आर्थिक कोंडीमुळे पाक क्रिकेटची वाढही खुंटली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयचे महत्व वाढले. जगात कुठेही क्रिकेटचा सामना असो, प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय संघाला लाभतो. वर्ल्डकपमध्ये भारताच्या सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा छान पाठिंबा लाभला असून सर्वत्र भारताचे झेंडे तसेच निळया जर्सीतील पाठराखे दिसतात.

ओल्ड ट्रॅफर्डवर पाकविरुध्दच्या लढतीत रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्या शतकी सलामीने भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहितचे वनडेतील २४ वे शतक, तसेच कर्णधार विराट कोहलीचा सातत्यपूर्ण खेळ यामुळे भारताने त्रिशतकी मजल मारली. भारत-पाक लढतीवर पावसाचे सावट होते. भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे नवोदित विजय शंकरला संधी मिळाली. वर्ल्डकपमधील पहिल्याच चेंडूवर विजयने इमाम-उल-हकला पायचीत पकडून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

फखर झमान, बाबर आझम यांच्या शतकी भागीदारीमुळे पाकच्या आशा पल्लवीत होत असताना कुलदीपच्या फिरकीने आणि हार्दिक पांड्याच्या अचूक गोलंदाजीपुढे पाकची मधली फळी गडगडली. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार ४० षटकांत ३०२ धावांचे सोपे आव्हान पाकला पेलवले नाही. पाकला ८९ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. अ‍ॅडलेड, बंगळुरु, मँचेस्टर, दरबान, मोहाली, सिडनीपाठोपाठ मँचेस्टरमध्येही पाकने पांढरे निशाण फडकावले. यंदा वर्ल्डकपमध्ये ५ पैकी ३ सामने गमावणार्‍या पाकच्या खात्यात ३ गुण जमा असून भारत ४ सामन्यातून ७ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -