घरक्रीडात्या पराभवांची परतफेड करणार?

त्या पराभवांची परतफेड करणार?

Subscribe

भारत-इंग्लंड उपांत्य फेरीतील सामना आज,महिला टी-२० वर्ल्डकप

इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभवामुळे २०१८ महिला टी-२० विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले. याच इंग्लंडने २०१७ साली इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतावर मात केली होती. मात्र, आता या पराभवांची परतफेड करण्याची भारतीय संघाला संधी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हे दोन संघ गुरुवारी आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाला सुरुवातीपासूनच यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत चारही साखळी सामने जिंकण्याची किमया साधली. परंतु, आता अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

महिला टी-२० विश्वचषकाच्या याआधीच्या सात पर्वांमध्ये भारताला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. यंदा हे चित्र बदलण्याचा भारताच्या खेळाडू प्रयत्न करतील. हरमनप्रीत कौरच्या संघाने यंदाच्या स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या आणि यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारत केली. त्यानंतर त्यांनी बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला पराभूत करत अ गटात ८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, इंग्लंडचा संघ भारताचा पुन्हा एकदा पराभव करण्यास उत्सुक असेल.

- Advertisement -

महिला टी-२० विश्वचषकात भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत पाच सामने झाले असून पाचही सामने इंग्लंडने जिंकले आहेत. मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीआधी इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ विश्वचषकात भारतावर मात केली होती. आम्ही संघ म्हणून एकत्र खेळले पाहिजे हे आम्हाला मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर जाणवले. आम्ही या गोष्टीवर खूप मेहनत घेतली. आता तुम्ही पाहू शकता की, आम्ही एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नाही, असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली.

भारताच्या खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. फलंदाजांमध्ये खासकरून शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. तर पूनम यादव, शिखा पांडे, राधा यादव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. आता उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर नॅटली स्किव्हर (२०२) आणि हेथर नाईट (१९३) या यंदाच्या स्पर्धेतील दोन सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ति, रिचा घोष, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.

इंग्लंड : हेथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमाँट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफी एक्लेस्टोन, जॉर्जिया एल्विस, साराह ग्लेन, एमी जोन्स (यष्टीरक्षक), नॅटली स्किव्हर, अन्या श्रुबसोल, मॅडी व्हिलियर्स, फ्रान विल्सन, लॉरेन विनफिल्ड, डॅनी वॅट.

सामन्याची वेळ : सकाळी ९:३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -