घरक्रीडाIND vs ENG : इंग्लंड मालिकेच्या अंती भारताला टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ कळेल!

IND vs ENG : इंग्लंड मालिकेच्या अंती भारताला टी-२० वर्ल्डकपसाठीचा संघ कळेल!

Subscribe

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी हे विधान केले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होईल. या मालिकेचे पाचही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहे. भारतात यावर्षी टी-२० विश्वचषक होणार असल्याने या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताने या मालिकेसाठी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या काही नवख्या खेळाडूंचीही निवड केली आहे. त्यामुळे हे खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे विशेष लक्ष असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अंती भारताला आपला सर्वोत्तम संघ कळेल, असे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना वाटते.

संघात फार फरक नसेल

यंदा टी-२० विश्वचषक भारतात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अंती आम्हाला विश्वचषकासाठी आमचा सर्वोत्तम संघ कळेल. या मालिकेत खेळणाऱ्या संघात आणि टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात फार फरक नसेल याची मला खात्री आहे. बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी करून आधीच त्यांचे संघातील स्थान निश्चित केले आहे. मात्र, एखाद्या खेळाडूची कामगिरी खालावली किंवा एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तर त्याची जागा कोणता खेळाडू घेऊ शकेल हे आम्हाला या मालिकेत कळू शकेल, असे राठोड या सांगितले.

- Advertisement -

स्ट्राईक रेट महत्वाचा नाही

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ आक्रमक शैलीत खेळेल का? असे विचारले असता विक्रम राठोड म्हणाले, आम्ही त्याबाबत फार विचार करत नाही. आमचे सामने जिंकण्याचे लक्ष्य असते. धावांचा पाठलाग करताना स्ट्राईक रेट फार महत्वाचा नसतो, कारण जिंकण्यासाठी किती धावा आवश्यक आहेत, हे तुम्हाला ठाऊक असते. त्यामुळे तुमचा ते लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न असतो. मग तुम्ही सामना १० षटकांत जिंकता किंवा २० षटकांत याने काहीच फरक पडत नाही. मात्र, प्रथम फलंदाजी करताना तुम्ही आक्रमकता दाखवणे गरजेचे असते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -