घरक्रीडाचॉपो-मोटॅंगचा गोल, पॅरिसचा विजय; तब्बल २५ वर्षांनी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत

चॉपो-मोटॅंगचा गोल, पॅरिसचा विजय; तब्बल २५ वर्षांनी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत

Subscribe

उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची पॅरिसची ही १९९५ नंतर पहिलीच वेळ आहे.

एरीक चॉपो-मोटॅंगने ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मानने अटलांटा संघाचा २-१ असा पराभव करत युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची पॅरिसची ही १९९५ नंतर पहिलीच वेळ आहे. उपांत्यपूर्व फेरीत सुरुवातीला राखीव खेळाडू असणाऱ्या चॉपो-मोटॅंगने उत्तरार्धात मैदानामध्ये उतरत पॅरिसला विजय मिळवून दिला. ‘मी आमच्या संघाला सामना जिंकवून देण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरलो आणि नंतर काय झाले हे सर्वांनीच पाहिले,’ असे सामन्यानंतर चॉपो-मोटॅंग म्हणाला.

पासलीचच्या गोलमुळे अटलांटाला आघाडी

इटालियन संघ अटलांटाने यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली. ते चॅम्पियन्स लीगची उपांत्यपूर्व फेरी गाठतील अशी फार कोणाला अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांनी सामन्यागणिक त्यांच्या खेळात सुधारणा केली. उपांत्यपूर्व फेरीतही २७ व्या मिनिटाला मारिओ पासलीचने केलेल्या गोलमुळे अटलांटाला १-० अशी आघाडी मिळाली. त्यांनी ही आघाडी बराच वेळ टिकवली. त्यातच पॅरिसच्या खेळाडूंना गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या, पण त्यांना याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.

- Advertisement -

एम्बापे, चॉपो-मोटॅंगची सामन्यात एंट्री

अटलांटा हा सामना जिंकणार असे वाटू लागले होते. मात्र, पॅरिसने उत्तरार्धात किलियन एम्बापे, चॉपो-मोटॅंग या खेळाडूंना मैदानात उतरवले. त्यामुळे पॅरिसने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. याचा फायदा त्यांना ९० व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा मार्क्विनियॉसने गोल करत पॅरिसला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी एम्बापेच्या पासवर चॉपो-मोटॅंगने केलेल्या गोलमुळे पॅरिसने हा सामना २-१ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य – नेयमार

पॅरिसचा स्टार खेळाडू नेयमारला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोल करण्याच्या दोन उत्तम संधी मिळाल्या, पण दोन्ही वेळा त्याला गोल करण्यात अपयश आले. गोल न करता आल्याचे दुःख असले, तरी आमच्या संघाने उपांत्य फेरी गाठण्याचा आनंद आहे, असे सामन्यानंतर नेयमारने सांगितले. तसेच आम्ही सामन्यात बराच वेळ पिछाडीवर होतो, पण आम्ही स्पर्धेतून बाहेर होऊ अशी भीती मला कधीही वाटली नाही. आम्ही पुनरागमन करू याची मला खात्री होती. मला आता उपांत्य फेरीचा सामना जिंकत अंतिम फेरी गाठायची आहे, असेही नेयमार म्हणाला.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -