घरक्रीडाभरवशाच्या म्हशीला...

भरवशाच्या म्हशीला…

Subscribe

भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून, आयपीएलमध्ये आणि रणजी करंडकात दिल्लीकडून खेळताना दमदार कामगिरी केल्यामुळे २०१७ साली पंतची भारताच्या मुख्य संघात निवड झाली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आक्रमक शैलीने खेळणार्‍या डावखुर्‍या पंतकडून सुरुवातीपासूनच खूप अपेक्षा होत्या. इंग्लंडमध्ये भारत ‘अ’ संघाकडून चांगली कामगिरी केल्याने त्याला २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

रिषभ पंत म्हणजे टीम इंडियाचे भविष्य! युवा असला तरी काय झाले, आता पंतला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज बनवण्याची वेळ आली आहे, असे अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत म्हटले जात होते. मात्र, काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर आता याच रिषभ पंतला संघातील स्थान टिकवण्यासाठी झुंजावे लागत आहे. हे काही प्रमाणात अपेक्षितही होते, कारण तो ज्या खेळाडूची जागा घेत आहे त्याचे भारतीय क्रिकेटला योगदानच तितके मोठे आहे. भारतीय क्रिकेट संघ म्हटले की, मागील १०-१५ वर्षांत ७ नंबर असलेली जर्सी डोळ्यासमोर यायची. ही जर्सी घालणारा खेळाडूच तितका खास आहे. भारतीय चाहत्यांना यष्टींमागे त्या खेळाडूला पाहायची जणू सवयच लागली आहे. तो खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी.

‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला. भारताला फारुख इंजिनियर, सय्यद किरमाणी, किरण मोरे यासारख्या यशस्वी यष्टिरक्षकांचा वारसा आहे. हे यष्टीरक्षक फलंदाजी करू शकत होते, पण ते त्यांच्या यष्टिरक्षणासाठी जास्त ओळखले जायचे. मात्र, धोनीने हे चित्र बदलले. धोनी जितका उत्कृष्ट कर्णधार आणि यष्टीरक्षक आहे, तितकाच किंवा त्यापेक्षा उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे त्याची जागा घेणार्‍या यष्टिरक्षकावर सातत्याने धावा करण्याचा दबाव येणारच होता.

- Advertisement -

परंतु, हा दबाव इतका असेल, याची युवा पंतने अपेक्षा केली नसावी. पंतला एकीकडे धावा करण्यात अपयश येत असतानाच धोनी अजून निवृत्त झालेला नाही. परंतु, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन आता भविष्याचा विचार करत असल्यामुळे धोनीला काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, चाहते आणि काही क्रिकेट समीक्षकांना धोनीला पुन्हा संघात घ्यायला हवे असे वाटते. त्यामुळे पंतवरील दबाव आता वाढत आहे.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून, आयपीएलमध्ये आणि रणजी करंडकात दिल्लीकडून खेळताना दमदार कामगिरी केल्यामुळे २०१७ साली पंतची भारताच्या मुख्य संघात निवड झाली. त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आक्रमक शैलीने खेळणार्‍या डावखुर्‍या पंतकडून सुरुवातीपासूनच खूप अपेक्षा होत्या. इंग्लंडमध्ये भारत ‘अ’ संघाकडून चांगली कामगिरी केल्याने त्याला २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. त्याने आपल्या तिसर्‍याच सामन्यात ११४ धावांची खेळी केली. त्यानंतरच्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारतात झालेल्या सलग दोन सामन्यांत त्याने ९२-९२ धावा केल्या. पुढे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावले. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा आणखीच वाढल्या. दुसरीकडे धोनीला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकांत वेगाने धावा करण्यात अपयश येत होते. त्यामुळे पंतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही संधी द्यावी अशी मागणी होऊ लागली. पंतमध्ये वेगाने धावा करण्याची क्षमता असल्याने अखेर निवड समितीने त्याला मागील वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली.

- Advertisement -

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांत त्याला ९३ धावाच करता आल्या आणि त्याने यष्टींमागेही काही चुका केल्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी दिनेश कार्तिकची राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली. मात्र, वर्ल्डकपदरम्यान सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली आणि पंतची संघात पुन्हा एंट्री झाली. अष्टपैलू विजय शंकरही जायबंदी झाल्याने पंतला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. युवराज सिंगनंतर भारताला चौथ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज मिळाला नाही. युवराजलाही पंत या क्रमांकासाठी योग्य वाटत होता. पंतने संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि युवराजचाही विश्वास काहीसा सार्थकी लावत वर्ल्डकपच्या ४ सामन्यांत ११६ धावा केल्या.

मात्र, याच वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामान्यातील खेळाने पंतला अडचणीत टाकले. या सामन्यात २४० धावांचा पाठलाग करताना भारताची ४ बाद २४ अशी अवस्था होती. पंत आणि हार्दिक पांड्याने ४७ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा मोह पंतला आवरला नाही आणि ५६ चेंडूत ३२ धावा तो करुन माघारी परतला. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी लागणारा संयम पंतमध्ये आहे का आणि तो धोनीची जागा खरच घेऊ शकतो का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.

वर्ल्डकपनंतरच्या वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी धोनी उपलब्ध नसल्याने पंतला कसोटीप्रमाणे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही यष्टींमागे उभे राहण्याची संधी मिळाली. धोनी संघात नसल्याने पंतवरील दडपण थोडे कमी होईल असे वाटले होते. मात्र, त्याच्या खेळातून ते अजिबातच जाणवले नाही. या दौर्‍यातील ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांत मिळून त्याला केवळ १ अर्धशतक झळकावता आले. २ कसोटी सामन्यांतही त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच तो वारंवार डावाच्या सुरुवातीलाच खराब फटके मारून बाद झाला. त्यामुळे त्याने स्वतःसाठी अडचणी वाढवल्या. कायम त्याला पाठिंबा देणारे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली हेसुद्धा पंतच्या कामगिरीवर आणि त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर नाखूष होते. पंतने आता सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची वेळ आली आहे, असे हे दोघे म्हणाले.

चांगल्या आणि महान खेळाडूंमध्ये इतकाच फरक असतो की, ते चुकांमधून शिकतात आणि आपल्या खेळात सुधारणा करतात. पंत वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत खराब फटका मारून बाद झाला, तेव्हा तो स्वतःवर फार चिडला होता. तो त्यावेळी खेळपट्टीवर टिकला असता, तर कदाचित त्या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पंत त्या चुकीतून शिकेल असे वाटले होते. मात्र, अजूनतरी तसे झालेले नाही. पंतमध्ये खूप प्रतिभा आहे यात शंका नाही, पण या प्रतिभेला संयमाची जोड नाही. परंतु, तो अजून केवळ २१ वर्षांचा आहे हेसुद्ध विसरून चालणार नाही. पंतचे वय, त्याच्यातील क्षमता आणि तो कोणाची जागा घेत आहे, हे लक्षात घेऊन शास्त्री-कोहली त्याला जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पंतने खेळात सुधारणा केली नाही, तर हे दोघे पर्यायी खेळाडूंचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतची कामगिरी

    -सामने-  -धावा -सरासरी -शतके -अर्धशतके

कसोटी         -११ -७५४ -४४.३५ -२ -२

एकदिवसीय    -१२ -२२९ -२२.९ -० -०

टी-२०           -१९ -३०६ -२०.४ -० -२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -