घरक्रीडावर्ल्डकपसाठी रसेलची वेस्ट इंडिज संघात निवड

वर्ल्डकपसाठी रसेलची वेस्ट इंडिज संघात निवड

Subscribe

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजने बुधवारी आपल्या संघाची घोषणा केली. या संघात विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेलची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे अनुभवी सलामीवीर क्रिस गेलचाही समावेश करण्यात आला आहे. किरॉन पोलार्ड, सुनील नरीन या अनुभवी खेळाडूंची मात्र या संघात निवड झालेली नाही, ही वेस्ट इंडियन चाहत्यांसाठी निराशेची बाब आहे.

आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणार्‍या क्रिस गेलने मागील काही महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मागील एकदिवसीय मालिकेच्या ४ सामन्यांत १०६ च्या सरासरीने ४२४ धावा केल्या होत्या. यात २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. त्याच्या या कामगिरीमुळे ५ सामन्यांची ही मालिका २-२ अशी बरोबरीत संपली होती. या मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांसाठी आंद्रे रसेलचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला या सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisement -

मात्र, सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना १० सामन्यांच्या ९ डावांत ३९२ धावा केल्या आहेत. त्याने या धावा २१८ च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. तसेच त्याने कोलकाताला काही सामने एकहातीच जिंकवून दिले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या निवड समितीने त्याची विश्वचषकासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निवडीबाबत निवड समितीचे अध्यक्ष रॉबर्ट हेन्स म्हणाले, मी चार दिवसांपूर्वी रसेलशी बोललो आणि विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट असण्याची शाश्वती त्याने मला दिली आहे. त्याला दुखापत झालेली असली तरी ती फारशी गंभीर नाही.

अनुभवी किरॉन पोलार्ड आणि सुनील नरीन यांच्याऐवजी वेस्ट इंडिजच्या निवड समितीने युवा निकोलस पूरन आणि फॅबियन अ‍ॅलन यांची विश्वचषकासाठी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलार्ड आणि नरीन या दोघांनीही आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये खेळला आहे. मात्र, या दोघांची विश्वचषकाच्या संघात निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झालेले नाही. नरीनची निवड न करण्याबाबत हेन्स म्हणाले, आम्ही सुनीलशी चर्चा केली आहे आणि तो वेस्ट इंडिजसाठी खेळण्यास उत्सुक आहे. मात्र, त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे आणि प्रत्येक आयपीएल सामन्यानंतर त्यावर उपचार केले जातात. त्यामुळे त्याच्यासाठी १० षटके टाकणे अशक्य झाले आहे. त्याला ४ षटके टाकतानाही त्रास होत आहे.

- Advertisement -

वेस्ट इंडिजचा या विश्वचषकातील पहिला सामना ३१ मे रोजी पाकिस्तनविरुद्ध होणार आहे.

वेस्ट इंडिज संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, आंद्रे रसेल, शेल्डन कॉटरल, शॅनन गेब्रियल, किमार रोच, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), अ‍ॅशले नर्स, फॅबियन अ‍ॅलन, शिमरॉन हेटमायर, शाई होप (यष्टीरक्षक), ओशेन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, इव्हन लुईस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -