घरक्रीडाविश्वचषक पूर्वतयारीचा पहिला टप्पा आज !

विश्वचषक पूर्वतयारीचा पहिला टप्पा आज !

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शनिवारी हैद्राबाद येथे होणार आहे. या मालिकेतील सामने इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाआधीचे अखेरचे आंतरराष्ट्रीय सामने असल्याने या मालिकेकडे विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. मात्र, असे असले तरी टी-२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही काही राखीव खेळाडूंना संधी देणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले आहे.

टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांत भारताला धूळ चारली. मात्र, या दोन्ही सामन्यांत भारताने सलामीवीर लोकेश राहुलला संधी दिली आणि त्याने या संधीचा चांगला उपयोग केला. त्याने पहिल्या सामन्यात ५० आणि दुसर्‍या सामन्यात ४७ धावा केल्या. राहुलला विश्वचषकासाठी राखीव सलामीवीर म्हणून पाहिले जात असल्याने त्याला एकदिवसीय मालिकेत काही सामने खेळण्याची संधी मिळणार हे निश्चित आहे. मागील काही काळात भारताच्या मुख्य सलामीविरांमध्ये रोहित शर्माने कामगिरीत सातत्य राखले आहे. मात्र, शिखर धवनला १४ सामन्यांत २ अर्धशतकेच करता आली आहेत. त्यामुळे या एकदिवसीय मालिकेत रोहितला काही सामन्यांत विश्रांती देऊन राहुल आणि धवनला डावाची सुरुवात करायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

तसेच युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारसे यश लाभलेले नाही. मात्र, त्याच्यामधील प्रतिभा लक्षात घेता त्याला विश्वचषकाआधी निवड समितीने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता मिळालेल्या या संधीचे पंत सोने करणार का याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. अष्टपैलू विजय शंकरने काही दिवसांपूर्वीच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेला मुकणार असल्याने शंकरला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच या मालिकेत काही राखीव खेळाडूंना संधी मिळणार असल्याने या मालिकेतील निकालापेक्षा या खेळाडूंचे प्रदर्शन अधिक महत्त्वाचे असणार आहे हे निश्चित.

सामन्याची वेळ – दुपारी १:३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -