घरक्रीडाTokyo Olympics : मातीतला खेळ तारणार!

Tokyo Olympics : मातीतला खेळ तारणार!

Subscribe

भारताच्या मातीतील खेळ...'कुस्ती'च आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तारणार असे दिसत आहे.

टोकियो ऑलिम्पिकमधील मागील काही दिवस भारतासाठी निराशा करणारे ठरले होते. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक जिंकत भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील दुसरे पदक जिंकवून दिले खरे, पण तिच्याकडून सर्वांचा सुवर्णपदकाची अपेक्षा होती. त्यामुळे तिने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केल्याबद्दल आनंद मानावा की सुवर्णपदक हातून गेल्याबद्दल दुःख? असाच चाहत्यांना आणि स्वतः सिंधूलाही प्रश्न पडला होता.

सिंधूला अपेक्षित ‘सुवर्ण’ कामगिरी करता आली नसली, तरी तिने कांस्यपदक जिंकत भारताच्या खात्यात आणखी एक पदक तरी टाकले, पण इतर खेळाडूंचे काय? भारताचे नेमबाज, बॉक्सर (लोव्हलिना बोर्गोहेन वगळून) यांना चांगली कामगिरी करता आली नाही. मेरी कोम आणि अमित पांघल यांसारखे आघाडीचे भारतीय बॉक्सरही पदकापासून वंचित राहिले. परंतु, आता भारताच्या मातीतील खेळ…’कुस्ती’च आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तारणार असे दिसत आहे.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांतील भारताच्या कुस्तीमधील आव्हानाला मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिला दिवस भारताची निराशा करणारा ठरला. सोनम मलिकला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इतर खेळांप्रमाणेच कुस्तीतही भारताला अपयश येणार की काय, असा चाहत्यांना प्रश्न पडू लागला होता. परंतु, लगेच दुसऱ्याच दिवशी भारताची चिंता मिटली. भारताचे कुस्तीपटू रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया यांनी बुधवारचा दिवस गाजवला.

दहियाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले असून त्याचे किमान रौप्यपदक निश्चित आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांत पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव, सुशील कुमार (२ पदके), योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांच्या पंक्तीत त्याने स्थान मिळवले आहे. परंतु, आता त्याला इतिहास रचण्याची संधी आहे. सुशील कुमारने २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि ही कोणत्याही भारतीय कुस्तीपटूने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. आता मात्र दहियाला ऑलिम्पिक स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरत ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे.

- Advertisement -

त्यातच दीपक पुनियाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी अजूनही त्याला पदक जिंकण्याची आहे. विशेष म्हणजे, भारताचे हुकमी एक्के म्हणून ओळखले जाणारे बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे अजून मैदानात उरलेले नाहीत. यंदा या दोघांकडूनही पदकांची अपेक्षा केली जात आहे. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद अशा विविध स्पर्धांत बजरंगने सुवर्णपदक पटकावले असून यंदा ऑलिम्पिकमधील त्याच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती, जी भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा भारताची चार पदके निश्चित झाली असून दोन्ही हॉकी संघांना अजूनही पदकांची संधी आहे. तसेच आपल्या मातीतला खेळ कुस्तीतही भारताला पदके जिंकण्यात यश आल्यास यंदा सहाचा आकडा सहज पार होऊन नवा विक्रम रचला जाऊ शकेल, हे नक्की!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -