घरक्रीडाहे आयपीएल आहे, क्लब क्रिकेट नाही

हे आयपीएल आहे, क्लब क्रिकेट नाही

Subscribe

विराट कोहलीची पंचांवर टीका

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना ६ धावांनी गमावला. या सामन्यात मुंबईने दिलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला १८१ धावाच करता आल्या. बंगळुरूला अखेरच्या षटकात जिंकण्यासाठी १७ धावांची गरज होती. लसिथ मलिंगा टाकत असलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुभम दुबेने षटकार लगावला. मात्र, यानंतरच्या दुबे आणि एबी डी व्हिलियर्सला ४ चेंडूंवर ४ धावाच करता आल्याने बंगळुरूला अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या दुबेला षटकार लगावता आला नाही आणि बंगळुरूचा पराभव झाला. मात्र, सामना संपल्यावर मलिंगाच्या षटकातील शेवटचा चेंडू नो-बॉल असल्याचे दिसले. मात्र, सामन्यादरम्यान ही गोष्ट पंच एस. रवी यांना लक्षात आली नाही. जर पंचानी योग्य निर्णय दिला असता तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. त्यामुळेच सामना संपल्यावर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पंचांवर टीका केली.

हे आयपीएल आहे, क्लब क्रिकेट नाही. पंचांचा हा निर्णय अतिशय खराब होता. पंचांनी मैदानात डोळे उघडे ठेवून उभे राहिले पाहिजे, गोलंदाजांचा पाय कितीतरी अंतराने रेषेच्या पुढे होता. जर पंचांनी योग्य निर्णय दिला असता, तर सामना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने संपला असता. या खेळात छोट्या-छोट्या गोष्टींनी निकालावर फरक पडतो, त्यामुळे मला कळतंच नाही अशा चुका होतात कशा. पंचांनी मैदानावर जास्त सजग राहिले पाहिजे. अशा अटीतटींच्या समान्यांमध्ये पंचांनी जास्त काळजी घ्यायला हवी, असे सामन्यानंतर कोहली म्हणाला.

- Advertisement -

कोहलीप्रमाणेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही पंचांवर टीका केली. मी मैदानातून बाहेर आल्यावरच मला समजले की शेवटचा चेंडू नो-बॉल होता. १९ व्या षटकातही (जसप्रीत) बुमराहने टाकलेला चेंडू व्हाईड नसतानाही तो देण्यात आला. अशाप्रकारच्या चुका या खेळासाठी चांगल्या नाहीत आणि ज्या गोष्टी खेळासाठी चांगल्या नाहीत त्यांचे मी समर्थन करणार नाही. या चुकीच्या निर्णयांमुळे तुम्ही सामना गमावू शकता आणि हे सामने गमावल्यामुळे तुम्ही ही स्पर्धा जिंकण्यापासून वंचित राहू शकता. आम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतो. त्यामुळे पंचांनी अशा चुका करून चालणार नाही, असे रोहित म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -