घरक्रीडाकोहलीच्या टीम इंडियाला नमवण्याचे सर्वांचे लक्ष्य!

कोहलीच्या टीम इंडियाला नमवण्याचे सर्वांचे लक्ष्य!

Subscribe

ब्रायन लाराचे मत

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील काही वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारत सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल, तर एकदिवसीय क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. खासकरून कसोटी क्रिकेटमधील या संघाची कामगिरी फारच उल्लेखनीय आहे. कोहलीच्या संघाने घरच्या मैदानावर सलग १२ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तसेच आयसीसीच्या जागतिक स्पर्धांची त्यांनी सातत्याने उपांत्य आणि अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, मोक्याच्या क्षणी त्यांना सर्वोत्तम खेळ न करता आल्याने त्यांची विश्वविजेतेपदाची पाटी कोरी आहे. परंतु, कोहलीच्या संघात आयसीसीची स्पर्धा जिंकण्याची क्षमता असून भारताला नमवण्याचे सर्व संघांचे लक्ष्य असते, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने व्यक्त केले.

भारताच्या संघाने मागील काही काळात खूपच चांगला खेळ केला आहे. या संघात आयसीसीच्या सर्व जागतिक स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे. प्रत्येक संघाचे भारताला नमवण्याचे लक्ष्य असते आणि या गोष्टीचा कर्णधार विराट कोहली, तसेच इतर सदस्यांना आनंद वाटला पाहिजे. जागतिक स्पर्धा जिंकायची असल्यास उपांत्यपूर्व, उपांत्य किंवा अंतिम फेरीत तुम्हाला भारतावर मात करावी लागणार, हे प्रत्येक संघाला माहीत असते, असे लाराने एका मुलाखतीत सांगितले. भारताने आपली अखेरची आयसीसी स्पर्धा (चॅम्पियन्स ट्रॉफी) २०१३ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकली होती. आता कोहलीच्या संघाला यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार आहे, असे लाराला वाटते.

- Advertisement -

वॉर्नर, कोहली मोडू शकेल माझा विक्रम!

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये लाराची गणना होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम लाराच्या नावे आहे. त्याने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. हा विक्रम कोण मोडू शकेल असे विचारले असता लारा म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला हा विक्रम मोडणे अवघड जाईल. मात्र, डेविड वॉर्नर किंवा विराट कोहलीसारखा खेळाडू माझा विक्रम नक्कीच मोडू शकेल. तसेच रोहित शर्मा फॉर्मात असताना त्याला रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. त्यामुळे त्याच्यातही नवा विक्रम प्रथापित करण्याचे सामर्थ्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -