घर ठाणे भाजपला गांधी नावाच्या भीतीने झोप नाही लागत - विजय वडेट्टीवार

भाजपला गांधी नावाच्या भीतीने झोप नाही लागत – विजय वडेट्टीवार

Subscribe
 जेंव्हा सर्व पर्याय संपतात, तेंव्हा भाजपला गांधी परिवार दिसतो. मग गांधी परिवाराकडे बोटे दाखवली जातात. त्यामुळे गांधी नावाची भीती आहे, की त्यांना आता झोप लागत नाही. तसेच २०२४ मध्ये भाजप जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएम मशीनच्या भरोशावर ते झेंडा फडकतील अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर केली. तसेच जे मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले ४० आणि आत्ता जे गेले आहेत ते ४० हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. यामध्ये सर्वांनाच मंत्री पदाची ऑफर आहे. ज्यांना मिळाले ते मज्जेत आहेत. ज्यांना मिळाले नाही त्यांना केवळ बोंबलत राहावे लागणार असल्याचे म्हणत, त्यांनी यावेळी राज्यसरकार निशाणा साधला.
गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील टीका केली. दहा वर्षांच्या उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादी सारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती असा गंभीर आरोप त्यांनी केला. तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसीहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता मात्र देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नाही, दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला घराणेशाही विरोध करण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच अलबेला सुरू आहे,  एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील सरकारची आहे. ही केवळ राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -