Eco friendly bappa Competition
घर ठाणे ब्राह्मी लिपीचा संबंध ब्रह्माशी नसून धम्माशी-प्रा.आनंद देवडेकर

ब्राह्मी लिपीचा संबंध ब्रह्माशी नसून धम्माशी-प्रा.आनंद देवडेकर

Subscribe

मागधी भाषेने तथागत भगवान बुद्धांची शिकवण जतन रक्षण आणि पालन करुन ठेवल्यानं ज्याप्रमाणे ती पालि भाषा म्हणून अजरामर झाली त्याचप्रमाणे चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या शिलालेखातील धम्मसंदेशामुळे ब्राह्मी लिपी धम्मलिपी म्हणून पुनरुज्जीवीत होऊन सर्वमान्य झाली. ब्राह्मिचा संबंध ब्रह्माशी नसून धम्माशी आहे, असे सुस्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी ठाणे येथे केले. सम्राट अशोककालीन ब्राह्मी लिपी उजेडात आणणारे ब्रिटिश संशोधक जेम्स प्रिन्सेप यांच्या २२४ व्या जयंती निमित्त आयु. अशोक तपासे लिखित आणि अनुवादित ‘ पियदसि राञा हेवं आहा… ‘ या चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचा अंतर्भाव असलेल्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन लिपीतज्ज्ञ, पत्रकार प्रा. हिमांशु व्यास यांच्या हस्ते ठाणे येथील मॅपल इन सभागृहात झाले. त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात अनेक ऐतिहासिक दाखल्यांचे संदर्भ देत प्रा. आनंद देवडेकर पुढे म्हणाले की, सिंधुसंस्कृतीच्या उत्खननात मोहेंजोदडो आणि हराप्पात सापडलेलल्या हजारो वर्षांपूर्वीच्या भृर्जपत्रावरील अक्षरांशी तुलना करता ब्राह्मी लिपीचं नातं सिंधुकालीन लिपीशी असल्याचं सिद्ध होत आहे. पुढे या लिपीच्या विकासक्रमात चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळात तिला राजमान्यता मिळून या लिपीचा सार्वत्रिक वापर होत होता. त्याचे पुरावे म्हणजे अशोकाचे हे शिलालेख आहेत. लिपीतज्ज्ञ पत्रकार प्रा. हिमांशु व्यास आपल्या भाषणात म्हणाले की, बौद्ध धम्म आणि ब्राह्मी लिपी याबाबत हिंदी भाषक अभ्यासकांमध्ये असलेलं कुतूहल पाहता सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून अशोक तपासे यांनी हिंदीभाषक अभ्यासकांसाठी फार मोठी उपलब्धी करून दिली आहे. ब्राह्मी लिपीचं वैशिष्ट्य सांगताना प्रा. हिमांशु व्यास आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ब्राह्मी लिपी ही शास्त्रशुद्ध आणि तंत्रदृष्ट्या परिपूर्ण असून सहजसाध्य आणि सुलभ आहे. कोणतीही व्यक्ती ही सुंदर लिपी अल्पावधीतच अवगत करू शकते.

- Advertisement -

पुस्तकाचे लेखक आणि अनुवादक अशोक तपासे आपल्या भाषणात म्हणाले की, चक्रवर्ती सम्राट अशोकांचे हे शिलालेख केवळ राजाज्ञा नसून आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजाचं मन संस्कारीत करणाऱ्या तथागत बुद्धांच्या करुणामय प्रेमाचं द्योतक आहेत. इतकंच नव्हे तर शिलालेखांची संख्या बुद्धकाळ निश्चितिच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे.
नाशिकचे पालिभाषा अभ्यासक संतोष जोपुळकर, प्रा. गिरीश साळवे, प्रा. उत्तम भगत यांचीही या प्रसंगी समयोचित भाषणं झाली. लेणी संवर्धन समितीतील युवा अभ्यासकांसह अनेक मान्यवर या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव तपासे यांनी केले तर सूत्रसंचालन वैभव तपासे यांनी केले. विनित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर भोजन आस्वादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -