घरठाणेछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकल्प विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करणार - महापालिका आयुक्त

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रकल्प विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करणार – महापालिका आयुक्त

Subscribe

कळवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, तसेच वैद्यकिय महाविद्यालय यांचे रुप पूर्णपणे पालटून उत्तम दर्जाची रुग्णसेवा आणि गुणवत्तापूर्ण सुधारित इमारत व व्यवस्था उभे करण्याचे मोठे आव्हानात्मक कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आपल्यासमोर आहे. त्यादृष्टीने उपलब्ध प्रत्येक रुपयाचा अगदी सुयोग्य पद्धतीने वापर करून विशिष्ट कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत, असे प्रतिपादन आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत केले. बुधवारी, रक्षाबंधनाच्या दिवशी महापालिका मुख्यालयात घेण्यात आलेल्या विविध बैठकांच्या माध्यमातून आयुक्त बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुधारणा, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची प्रगती आणि १२ मजली वैद्यकिय महाविद्यालयाची रचना यांच्याबद्दल सविस्तर चर्चा केली.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयास दिलेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात सगळीकडे पाहणी केली होती. प्रत्येक वॉर्डमध्ये जावून त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यानंतर, रुग्णालयातील सुधारणा, विस्तार, निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाच्या कामाची स्थिती याबद्दल त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली. रुग्णालय दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यात आणखी भर घालण्याची आवश्यकता असेल तर ती मदत करू असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या पाहणी नंतर स्पष्ट केले होते.
रुग्ण सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच वैद्यकिय कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या व्यवस्थापनात तसेच इमारतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने कार्यालय अधीक्षक नेमणूक, बायोमेट्रिक हजेरी, नर्सेस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरती असे प्रशासकीय आणि कामकाजातील गुणात्मक बदल करण्यात आले आहेत. आता इमारतीतील सुधारणा आणि विस्तार याचे नियोजन सुरू करण्यात आल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यात केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे या इमारतीचे आयुष्यमान किती वाढेल याचा अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिले. सुधारणेचा आराखडा तयार करताना उपयोगिता आणि रचनेतील सुलभता व सुटसुटीतपणा यावर भर दिला जावा. एखाद्या व्यावसायिक रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयाचे रुप कसे पालटून टाकता येईल, हे सुनिश्चित करावे, असेही बांगर यांनी सांगितले.

- Advertisement -

रुग्णालयाच्या सध्याच्या ५०० खाटांची संख्या वाढवता येईल अशी जागा निर्माण करणे, ओपीडी विभाग अधिक सुटसुटीत करणे, स्ट्रक्चरल सुधारणा करणे, अभिज्ञासात्मक सुधारणा (लेआऊट मॉडिफिकेशन) करून नागरिकांना रुग्णालयात आल्यावर विविध ठिकाणी हेलपाटे न मारता मर्यादित ठिकाणी अपेक्षित सेवा मिळू शकेल, अंतर्गत बांधकाम दुरुस्ती करणे, लाद्या बदलणे, सूर्य प्रकाशाचा प्रभावी वापर करून पुरेशी प्रकाशयोजना करणे, गर्दीच्या विभागांचे विकेंद्रीकरण करणे, डॉक्टरांच्या वेळेचा कमाल वापर करणे, ज्या सुविधा मानवी हस्तक्षेपाशिवाय देणे शक्य असेल त्यांची रचना करणे, असे रुग्णालय सुधारणा कामाचे प्राथमिक स्वरूप राहील. त्यात अभ्यास करून नेमके नियोजन केले जाईल, असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. रुग्णालयात दररोज भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्या व्यतिरिक्त रुग्णालयात कोणीही प्रवेश करू नये यासाठी रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक प्रवेश नियंत्रण व्यवस्था राबविली जाईल. जेणेकरून रुग्णालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची नोंद होईल आणि रुग्णालयातील प्रवेशाचे नियमन होईल, असेही आयुक्त बांगर म्हणाले.

कमीतकमी वेळेत काम करण्याचे आव्हान
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांचा ओघ मोठा आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय न होता रुग्णालय सुधारणेची कामे जलद कशी केली जातील, याचेही नियोजन करणे हे या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे. रुग्णालयातील गर्दीची ठिकाणे, ओपोडी साठी आलेल्या रुग्णांना तपासणी, चाचणी यासाठी लागणारा वेळ, त्यात होणारा त्रास, डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम या सगळ्याचा नीट अभ्यास करूनच रुग्णालयातील नवीन रचनेची आखणी केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. रांगेत खोळंबा होण्यापेक्षा टोकन पद्धतीने वेळ दिल्यास आणि त्या काळात रुग्ण आणि नातेवाईक यांची बसण्याची योग्य सोय केल्यास बराच गोंधळ कमी होईल, असे निरीक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदवले.

- Advertisement -

वैद्यकिय महाविद्यालयाचे स्थलांतर
बाळकूम येथे बांधून तयार असलेल्या १२ मजली इमारतीत वैद्यकिय महाविद्यालयाचे स्थलांतर करणे हेही एक आव्हानात्मक काम आहे. रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेले वैद्यकिय महाविद्यालय स्थलांतरित झाले की रुग्णालय विस्तारासाठी मोठी जागा उपलब्ध होणार आहे.  कोविडोत्तर उपचारासाठी वापरण्यात आलेली सुविधा भूखंडावरील इमारत वैद्यकिय महाविद्यालयात रूपांतरित केली जाणार आहे. त्याचा प्रत्येक मजल्यावरील रचनेचा आरखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल अशा सर्व सुविधा या महाविद्यालयात तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागेल. त्यातही टप्याटप्याने स्थलांतर करता येईल का याचा विचार केला जात असल्याचेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. अर्थात, महाविद्यालयाचे स्थलांतर आणि रुग्णालय सुधारणा कामाची सुरुवात याचा एकमेकांशी संबंध असल्याने आराखडा तातडीने अंतिम करून निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आयुक्त  बांगर यांनी या बैठकीत दिले.

वसतिगृह सुधारणा कामाला वेग
रुग्णालय आवारात असलेल्या निवासी डॉक्टरांच्या वस्तीगृहाच्या सुधारणांचे काम वेगात सुरू आहे. त्याचा आढावा आयुक्त बांगर यांनी या बैठकीत घेतला. या वसतीगृहाचे काम २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या वसतीगृहाच्या कामाचा व तेथे दिल्या जात असलेल्या सुविधांचा दर्जा सर्वोत्तम रहावा यासाठी महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे. अत्यंत सुसज्ज, सुबक व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत लवकरच रुग्णसेवेचा कणा असलेल्या निवासी डॉक्टरांसाठी उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -