घरठाणेअफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करुन घ्यावे

अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करुन घ्यावे

Subscribe

केडीएमसी क्षेत्रात पहिल्या दिवसी ७४ ज्येष्ठ नागरिकांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली असून कोपरी येथील आरोग्यकेंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांनी आरोग्यकेंद्रास भेट दिली. यावेळी या आरोग्यकेंद्रावर ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महापौरांनी सर्वांना गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. तसेच लसीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौरांनी यावेळी सर्वांना केले. याचदरम्यान, ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह पाहून महापौरांनी समाधान व्यक्त केले. या आरोग्यकेंद्रावर ठाणे शहराच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका विणा भाटिया यांनी लसीकरण करुन घेतले त्याबद्दल त्यांचे महापौरांनी आभार व्यक्त केले. कोपरी आरोग्यकेंद्र येथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी महापौर नरेश म्हस्के यांनी संवाद साधला.

ॲपच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या आणि थेट आलेल्या नागरिकांनी सकाळपासूनच आरोग्यकेंद्रावर गर्दी केली होती. ॲपच्या माध्यमातून नोंदणी करताना तसेच लसीकरणाच्या ठिकाणी नावनोंदणी करीत असताना सर्व्हर डाऊन होत असल्याची बाब ‍ निदर्शनास आली व यामुळे नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागले ही बाब लक्षात येताच महापौरांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनास दिले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना आपण लस जरी घेतली असली तरी यापुढेही कायम मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन्सींग या सर्व बाबींचा अवलंब करावा असे आवाहनही महापौरांनी उपस्थ‍ितांना केले. यावेळी महापौरांनी ज्येष्ठ नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले व ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था व पाण्याची सोय करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. याप्रसंगी, नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरूडकर, कोपरी आरोग्यकेंद्राचे डॉ. संजय पिंगुळकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोविड १९ लसीकरण सत्रास १ मार्च २०२१ पासून सुरुवात झाली. कल्याण येथील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय येथे लसीकरण सुरु आहे. पहिल्या दिवसी ७४ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती पालिकेचे डॉ.निंबाळकर यांनी दिली. मात्र दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी सकाळपासून संकेतस्थळातील त्रुटीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी करणे शक्य झाले नाही.
परिणामी केंद्रात लस टोचण्याचे काम संथ गतीने सुरु होते. लस टोचण्यासाठी आवश्यक नोंदणी न करताच काही ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रात येत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणीची प्रक्रिया समजाविण्यात आली. याबाबत शास्त्रीनगर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या, लस टोचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसर्या दिवशी शास्त्रीनगर रुग्णालयात दुपारी ४ वाजेपर्यत ६५ ज्येष्ठ नागरिकांनि लस टोचून घेतली.Cowin.gov.in या संकेतस्थळावर ज्येष्ठ नागरिकांनी आपली नोदणी करून लसीकरण केंद्रात होणारी गर्दी टाळावी असे आवाहन पालिका प्रशासने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -