विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्च मधील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकऱ्यांचा लॉंग मार्च वासिंद येथे थांबला असून त्यामधील पुंडलिक जाधव या शेतकऱ्याला रात्री उलट्यांचा त्रास व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वासिंद येथे उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हारुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून अधिक तपास वासिंद पोलीस करीत आहेत. मृत पुंडलिक जाधव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मावडी येथील राहणारे असून वनप्लॉट नावावर करणे शेत मालाला योग्य भाव देणे आदी मागण्यांसाठी ते लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले होते.