घरठाणेसानुग्रह अनुदान देताना विश्वासात न घेतल्याने कामगार आक्रमक

सानुग्रह अनुदान देताना विश्वासात न घेतल्याने कामगार आक्रमक

Subscribe

भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने काही मोजक्या कामगार संघटनांना हाताशी धरून घाईघाईत कमी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली असून ती बहुसंख्य कामगारांना मान्य नसल्याने या विरोधात 9 नोव्हेंबर 2023 रोजी पालिका प्रशासनाच्या विरोधात प्रांत कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढून निषेध नोंदविणार असल्याची माहिती लेबर फ्रंट कामगार संघटनेचे अ‍ॅड किरण चन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या प्रसंगी या मनसे महानगरपालिका कामगार संघटनेचे संतोष साळवी, अखिल भारतीय मजदूर काँग्रेस संघटनेचे राजू चव्हाण, लेबर फ्रंटचे संतोष चव्हाण, चंद्रकांत सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पालिका आयुक्तांनी सोमवारी काही मोजक्या कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून 13 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. यास अ‍ॅड किरण चन्ने यांनी आक्षेप घेतला आहे. कामगार संघटनांच्या कृती समिती सोबत एक नोव्हेंबर रोजी चर्चेत कामगार संघटनांनी 15 हजार 200 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. ती चर्चा फिस्कटल्या नंतर दोन दिवसात पुन्हा चर्चा करू,असे ठरले असताना पालिका आयुक्त यांनी परस्पर ज्या कामगार संघटनांचे अस्तित्व नाही अशा संघटनांच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा केल्याचे चन्ने यांचे म्हणणे आहे.

अर्थसंकल्पात मागील वर्षी 4 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद असताना 11 हजार 100 रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. तर यावेळी अर्थसंकल्पात 6 कोटी रुपयांची तरतूद केल्याने पालिकेतील 4225 कामगारांना 14 हजार 200 रुपयांची तरतूद केली आहे.त्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून 15 हजार 200 रुपयांची मागणी केली असताना ,श्रेय वादातून काही लोकप्रतिनिधी यांनी पालिकेच्या निर्णयास सहमती दर्शवली उलट त्यांनी पालिका कर्मचार्‍यांच्या बाजूने उभे राहणे अपेक्षित असताना त्यांनी प्रशासनाच्या सोबतीने कामगारांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अँड किरण चन्ने यांनी केला आहे.या विरोधात कामगार आक्रमक असून गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला जाईल, असे शेवटी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -