घरमुंबईराष्ट्रवादीच्या कॅन्हॉसवरून अजित पवार गायब

राष्ट्रवादीच्या कॅन्हॉसवरून अजित पवार गायब

Subscribe

शरद पवार ठरत आहेत एकांडा शिलेदार

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. एका बाजुला भाजप-शिवसेनेने एकामागो एक असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांना फोडून पक्षात घेतल्याने दोन्ही काँग्रेसची स्थिती निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत नाजूक बनली आहे, तरीही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे एकटेच राज्यभर भ्रमंती करताना दिसत आहेत, त्यांच्यासोबत कुठेही राष्ट्रवादी विधीमंडळ नेते अजित पवार दिसत नाही. त्यामुळे हा आता उत्सूकतेचा विषय बनला आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी हायकोर्टाच्या आदेशानंतर अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तेव्हापासून अजित पवार हे राष्ट्रवादीच्या कॅन्हॉसवरून अचानक अदृश्य झाले, निवडणुकीत याचा पक्षाला फटका बसू नये, म्हणून ते अद्याप शरद पवारांसोबत दिसत नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात विधानसभेत भाजपला येनकेन प्रकारेण सर्वाधिक जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे, मात्र राज्यातील कानाकोपरात जेवढे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे जाळे पसरले आहे, तितके भाजपचे नसल्याने भाजपला लक्षपूर्ती करणे कठीण होते, त्यामुळे भाजपने सर्व विधीनिषेध बाजूला ठेवून राष्ट्र्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आजीमाजी आमदार, खासदारांना फोडून भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला. त्यामुळे आता दोन्ही काँग्रेसकडे बहुतेक ठिकाणी विधानसभेसाठी उमेदवारच नसल्याची स्थिती आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे निराशा झटकून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर निघाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जावून त्यांचे मनोबल वाढवत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दिसतात. वयाच्या ७९व्या वर्षीही पक्षाला लागलेली घरघर दूर करण्यासाठी पवार मोठ्या हिंमतीने उभे राहिले असताना त्यांच्या सोबत अजित पवार कुठेच दिसत नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. अजित पवार मोठ्या हिरीरीने शिवस्वराज्य यात्रेत दिसले, मात्र त्यानंतर त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अचानक गायब झाले. १५ दिवसांपासून काँग्रेससोबत जागा वाटपाच्या बैठका पार पडल्या. त्या त्या वेळी दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी माध्यमांसमोर आले, मात्र त्यावेळीही अजित पवार दिसले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून ‘अजित पवार आहेत कुठे?’, असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहेत.

- Advertisement -

भाजपने ईडीच्या चौकशीचे भय दाखवून राष्ट्र्रवादीच्या नेत्यांना गळाला लावल्याचा जसा आरोप होत आहे, तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रीत पकडले आहे, असाही आरोप होत आहे. कालपर्यंत अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याविषयी वरवरचे आरोप होत होते, मात्र आता गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली आहे,अशा वेळी अजित पवार राजकीय पडद्यावर उघडपणे दिसले तर पक्षाची नाचक्की होण्याची भीती असल्याने सध्या निवडणूक पूर्व तयारीत अजित पवारांना बाजुला ठेवल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -