नकारात्मक भुमिकेमुळे आशुतोषने ओढावला शेजारच्यांचा रोष!

आशुतोष पत्की

अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या मालिकेतील बरेचसे चेहरे प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. मात्र यात ‘सोहम’ ही व्यक्तीरेखा साकारणारा नवखा कलाकार आशुतोष पत्की हा प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. तर आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. मालिकेत सोहमची भूमिका साकारल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्यात काय बदल घडले याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले.

लोकांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना तो म्हणाला, “होय, माझी भूमिका थोडी नकारात्मक आहे. सोहम हा बिघडलेला मुलगा आहे ज्याला त्याच्या आईची काहीच काळजी नसते. काहीजण काल्पनिक घटना म्हणून मालिका बघतात, तर काहीजण मालिकेच्या कथेत गुंतून जातात आणि त्यांना ते खरं आहे असं वाटू लागतं. एकदा मी, माझा मित्र आणि त्याचे बाबा एकत्र दुपारी जेवायला बाहेर गेलो होतो. माझ्या मित्राचे बाबा ही मालिका पाहतात आणि त्यांनी चक्क त्याला विचारलं की, आशुतोष हा खऱ्या आयुष्यातसुद्धा सोहमसारखा आहे का? इतकंच नव्हे तर माझ्या शेजारचे मालिका पाहण्याआधी माझ्याशी नीट वागत होते. पण आता ते मला दुर्लक्ष करतात.” या सर्व गोष्टींकडे सकारात्मकरित्या पाहत असल्याचं आशुतोष सांगतो.

हि मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. आसावरी आणि अभिजीत राजे यांचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे. प्रेक्षक अभिजीत आणि आसावरी यांचा लग्न सोहळा रविवार १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या विवाह विशेष भागात पाहू शकतात.