‘लकी’ मधून बप्पीदांची मराठीत २८ वर्षांनी वापसी

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

Mumbai
Bappi Lahiri singing for Lucky
लकी सिनेमाची टीम

आपल्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत सुप्रसिध्द संगीतकार आणि गायक बप्पी लाहिरींनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर नोंदवले. जगविख्यात बप्पी लाहिरींनी ४५ वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी सिनेमाव्दारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केले आहे. तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतनेही गाणे गायले आहे.

रेकॉर्डिंग झाल्यावर संगीतकार अमितराज म्हणाला, “माझ्या करियरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठं गिफ्ट असतं.”

बप्पी लाहिरी म्हणाले की, “मराठी सिनेसृष्टीत आणि मराठी माणसांसोबत काम करायला मला खूप आवडते. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. १९७५ ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर खऱ्या अर्थाने सुरू झाले आणि मी ‘लकी’ ठरलो.”

ते पूढे म्हणाले की, “मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. तरीही १९९० ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधव यांच्या सिनेमामूळे मी मराठीत परत येऊ शकलो. अमितराजने गाण्याला दिलेली चाल मला आवडली. पटकन ओठांवर रूळेल, असे हे गाणे आहे. लकी सिनेमासाठी संजय जाधव ह्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा”

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणे गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातले खुप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाव्दारे आम्ही मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतोय, ह्याचा अभिमान वाटतोय”. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here