‘गीतरामायणा’ची हिंदी रूपातील सांगीतिक मैफिल लवकरच…

Mumbai
Hindi musical concert of geetaramayana coming soon

महाराष्ट्रातल्या मातीतले सर्वश्रेष्ठ आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा आणि लोकप्रिय ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या अथक परिश्रमातून ‘गीतरामायण’ निर्माण झाले. या दोन दिग्गजांच्या प्रतिभेचा सर्वांगसुंदर अविष्कार म्हणजे ‘गीतरामायण’. आजवर देश-परदेशात अनेक कार्यक्रम गीतरामायणाचे आणि या कार्यक्रमांना रसिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव असलेल्या गीतरामायणाच्या हिंदी रूपातील सांगीतिक मैफिलीचा आनंद घेण्याची संधी लवकरच रसिकांना उपलब्ध होणार आहे. हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या सौजन्याने गीतरामायणावर आधारित सुनील सुधाकर देशपांडे रचित ‘संगीत रामायण’ या भावानुवादाचा लोकार्पण सोहळा रविवार २५ ऑगस्टला सायं. ५.३० वा. प्राचार्य बी.एन वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय येथे रंगणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. आचार्य श्री.सूर्यप्रकाशजी दीक्षित (पूर्व हिंदी विभागप्रमुख, लखनऊ विश्वविद्यालय), श्री.आनंदजी माडगूळकर (कार्यकारी विश्वस्त, ग.दि.माडगूळकर प्रतिष्ठान), श्री.शीतला प्रसादजी दुबे, (अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी, मुंबई विभाग), श्री.सुंदरचंदजी ठाकूर (संपादक नवभारत टाइम्स) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध गायिका संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संगीतसंयोजनांतर्गत ‘संगीत रामायणातील’ काही निवडक गाणी सादर केली जातील.

‘‘रसिकांना अभिमान वाटावा अशा मराठी भाषेतील वाङ्मयीन आणि सांगीतिक अशा ज्या निवडक कलाकृती आहेत. त्यात गीतरामायणाचे स्थान अग्रस्थानी आहे. या गीतांचा सुश्राव्य आनंद हिंदी भाषेमध्ये ही अनुभवायला मिळावा या उद्देशाने आम्ही ‘संगीत रामायण’ या कार्यक्रमाची संकल्पना साकारली’’ असल्याचे रचनाकार सुनील देशपांडे सांगतात. जीवनमूल्यांची ओळख करून देणारा गीतरामायणाचा हा ठेवा इतर भाषिक लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न रसिकांना वेगळी अनुभूती देणारा असेल हे नक्की.